रेशन कार्ड हरवलंय? सरकारी कार्यालयात जाण्याची गरज नाही; मोबाईलवरच मिळवा डिजिटल प्रत, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया


पुणे : रेशन कार्ड हे भारत सरकारच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून दिले जाणारे महत्त्वाचे अधिकृत दस्तऐवज आहे. गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना सवलतीच्या दरात किंवा मोफत धान्य मिळण्यासाठी त्याचा वापर केला जातो. ‘वन नेशन, वन रेशन कार्ड’ योजनेमुळे आता देशातील कोणत्याही राज्यातील सरकारी रेशन दुकानातून लाभार्थी धान्य घेऊ शकतात.

आर्थिक स्थितीनुसार रेशन कार्डचे पिवळे, केसरी आणि पांढरे असे तीन प्रकार आहेत. अत्यंत गरीब कुटुंबांना पिवळे रेशन कार्ड दिले जाते, ज्यावर सर्वाधिक सवलत मिळते. तर वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त असलेल्या कुटुंबांना पांढरे रेशन कार्ड दिले जाते. या कार्डधारकांना मोफत किंवा सवलतीच्या दरात धान्य मिळत नसले, तरी रेशन कार्ड हे महत्त्वाचे ओळखपत्र असल्याने ते जपून ठेवणे आवश्यक आहे.

जर रेशन कार्ड हरवले किंवा खराब झाले, तर आता सरकारी कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची गरज नाही. स्मार्टफोनच्या मदतीने काही मिनिटांतच त्याची डिजिटल प्रत डाउनलोड करता येते.

Mera Ration App वरून डिजिटल रेशन कार्ड कसे डाउनलोड कराल?

Google Play Store वरून Mera Ration App डाउनलोड करा.
भाषा निवडून आधार क्रमांक आणि OTP द्वारे लॉगिन करा.
सुरक्षेसाठी MPIN सेट करा.
लॉगिन झाल्यानंतर रेशन कार्डची माहिती दिसेल.
Download पर्यायावर क्लिक करून PDF मोबाईलमध्ये सेव्ह करा.

DigiLocker वरून डिजिटल प्रत कशी मिळवाल?

Google Play Store वरून DigiLocker ॲप डाउनलोड करा.
आधारशी लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकाद्वारे OTP वापरून लॉगिन करा.
ॲपमध्ये Ration Card शोधा.
आपल्या राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाची निवड करा.
रेशन कार्ड क्रमांक किंवा आधार क्रमांक टाका.
Get Document वर क्लिक करताच डिजिटल प्रत उपलब्ध होईल.

राज्याच्या PDS पोर्टलवरूनही डाउनलोड करता येईल

राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
रेशन कार्ड संबंधित लिंकवर क्लिक करा.
जिल्हा, तालुका आणि इतर आवश्यक माहिती भरा.
रेशन कार्ड क्रमांक किंवा कुटुंबप्रमुखाच्या नावाने शोधा.
रेशन कार्ड दिसल्यानंतर ते डाउनलोड किंवा प्रिंट करून वापरता येईल.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!