लोणी काळभोर पोलिसांची अंमली पदार्थांविरोधात धडक कारवाई; कदमवाकवस्ती, कुंजीरवाडी, एमआयटी व लोणी कॉर्नर परिसरातून गांजा सेवन करणारे ७ जण जेरबंद

लोणी काळभोर : अंमली पदार्थांच्या वाढत्या गैरव्यवहाराला आळा घालण्यासाठी लोणी काळभोर पोलिसांनी राबविलेल्या विशेष मोहिमेत गुरुवारी (दि. १६) सलग धडक कारवाया करत कदमवाकवस्ती, कुंजीरवाडी, एमआयटी कॉर्नर आणि लोणी कॉर्नर परिसरातून गांजा सेवन करणाऱ्या सात जणांना रंगेहात पकडले. या सर्वाविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून परिसरात अंमली पदार्थांविरोधातील पोलिसांचा हा मोठा दणका मानला जात आहे.

अटक करण्यात आलेल्यांमध्ये सुरज जीवन सोळंकी (२५), संजू गणेश सोळंकी (२७), दीपक नवनाथ सोनवणे (४१), लक्ष्मण सुखदेव मेटकरी (३५), अनिल काशिनाथ भगत (५३), किसन भिमा गुजराती (२६) यांचा समावेश आहे. सुरज जीवन सोळंकी हा दोन स्वतंत्र कारवायांमध्ये गांजा सेवन करताना आढळून आल्याने त्याच्यावर स्वतंत्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पहिली कारवाई कदमवाकवस्ती येथील विश्वराज हॉस्पिटलजवळील सरकारमान्य ताडी केंद्राच्या मागील मोकळ्या जागेत करण्यात आली. येथे तिघेजण गांजा भरलेल्या चिलीममधून अंमली पदार्थाचे सेवन करताना पोलिसांना आढळले. त्यानंतर एमआयटी कॉर्नरजवळील पुणे–सोलापूर महामार्गावरील पुलाखाली छापा टाकून आणखी दोघांना गांजा ओढताना पकडण्यात आले. दोन्ही कारवायांमध्ये चिलीम जप्त करून पंचनामा करण्यात आला.

लोणी कॉर्नर परिसरातील स्मशानभूमीलगतच्या मोकळ्या जागेत किसन भिमा गुजराती हा गांजा सेवन करताना आढळून आला. पोलिसांनी त्याच्याकडील चिलीम व काडेपेटी जागीच नष्ट करून त्याच्यावर गुन्हा दाखल केला. तसेच थेऊर फाटा–थेऊर रोडवरील रेल्वे पुलाखाली गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या कारवाईत सुरज जीवन सोळंकी हा पुन्हा गांजा सेवन करताना आढळून आला. त्याच्यावर स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला.

ही संपूर्ण मोहीम वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अरुण जाधव, पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद जगताप, पोलीस हवालदार आण्णा माने, सुरज कुंभार तसेच पोलीस अंमलदार प्रवीण दडस, सागर धायतोंडे, गिरी, राहुल कर्डीले, विक्रम धराडे, किरण गायकवाड व त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
पोलिसांनी सर्व आरोपींविरुद्ध अंमली पदार्थ व मनःप्रभावी द्रव्ये प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल केले असून पुढील तपास सुरू आहे. स्थानिक परिसरात अंमली पदार्थांचे सेवन व गैरव्यवहार रोखण्यासाठी अशा धडक कारवाया यापुढेही सातत्याने सुरू राहणार असल्याचा इशारा लोणी काळभोर पोलिसांनी दिला आहे.