Loni Kalbhor News : लोणी स्टेशन येथे गणपती वर्गणीच्या नावाखाली किराणा दुकानदाराला दमदाटी करुन मारहाण, चौघांविरोधात गुन्हा दाखल..
Loni Kalbhor News लोणी काळभोर : गणेशोत्सवासाठी ३ हजार रुपयांची वर्गणी देण्याचा तगादा लावून इतकी वर्गणी देण्यास तयार नसल्याने मंडळाच्या कार्यकर्त्यांनी दुकानदाराला मारहाण करुन दुकानाची तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. (Loni Kalbhor News)
ही घटना लोणी स्टेशन येथील न्यू बालाजी ट्रेडर्समध्ये रविवारी (ता.१०) रात्री आठ वाजता घडली आहे. या मारहाणीचा व्हिडीओ सध्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
याप्रकरणी दिनेश भिकाराम गोरा (वय २०, रा. लोणी काळभोर) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी शिवम जयपाल सिंग ऊर्फ मुन्ना (वय. २७), तुषार संजय थोरात (वय. १९), निखिल दिलीप कांबळे (वय. १९) व त्यांच्या एका साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, फिर्यादी हे त्यांच्या भावासोबत किराणा दुकानात काम करत होते. त्यावेळी श्रीमंत काळभैरवनाथ प्रतिष्ठान मंडळ व अष्टविनायक मंडळाचे कार्यकर्ते त्यांच्याकडे वर्गणी मागण्यासाठी आले.
त्यांनी फिर्यादीकडे ३ हजार रुपयांची वर्गणी मागितली. फिर्यादी हे १०१ रुपये वर्गणी देण्यास तयार होते. तरीही ३ हजार रुपयांची पावती फाडावी, अशी त्यांनी मागणी केली. फिर्यादीने त्याला नकार दिल्यावर शिवम व निखिल यांनी फिर्यादी यांना हाताने मारहाण करुन शिवीगाळ केली.
तुषार याने दुकानातील कॅल्युलेटर व मोबाईलची तोडफोड करुन शिवीगाळ केली. पोलीस उपनिरीक्षक धायगुडे तपास करीत आहेत. दरम्यान,या मारहाणीचा व्हिडीओ सध्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.