लोणी काळभोर कदमवाकवस्ती येथे कडकडीत बंद, जालना जिल्ह्यातील घटनेचा निषेध; अत्यावश्यक सोडून सर्व व्यवहार ठप्प..

उरुळी कांचन : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणी करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. या घटनेमुळे राज्यभरातील वातावरण देखील चांगलेच तापले आहे. यामुळे मराठा समाज आक्रमक झाला आहे.
अनेक ठिकाणी याचा तीव्र निषेध देखील करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर मंगळवारी (ता. ०५) संपूर्ण दिवस सर्वधर्मीय एकत्र येत पूर्व हवेलीतील लोणी काळभोर व कदमवाकवस्ती हि गावे बंद ठेवली होती.
अत्यावश्यक सोडून सर्व व्यवहार ठप्प..
यावेळी बाजारपेठेतील तुरळक दुकाने सोडली तर शंभर टक्के बंद पाळण्यात आला होता. तसेच अत्यावश्यक सेवेतील मेडिकल दवाखाने वगळता सर्व व्यावसायिकांनी उत्स्फूर्तपणे बंद पाळला होता.
यावेळी नागरिकांनी छत्रपती शिवाजी महाराज कि “जय”, जय भवानी जय शिवाजी, ‘एक मराठा लाख मराठा’च्या घोषणाबाजी करत तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. दत्त मंदिर चौक परिसरात निषेध आंदोलन केले तसेच उपस्थित मान्यवरांनी आपापली मते व्यक्त केली.
लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीत मंगळवारी (ता. ०५) सकाळी अकरा वाजता निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते. तत्पूर्वी लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील भक्तीशक्ती शिल्प या ठिकाणी जगतगुरु संत तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून रलीची सुरुवात करण्यात आली.
या बंदला नागरिकांनी उत्स्फूर्तपणे पाठींबा दिल्याने नेहमी गजबजलेली लोणी काळभोर स्टेशन, लोणी काळभोर परिसरातील दत्त मंदिर चौक ओस पडल्याचे चित्र होते. यावेळी सर्व लहान मोठे व्यवहार बंद ठेवण्यात होते.