दोघांनी रस्ता विचारला; पुण्यातील ज्येष्ठानं मदत केली, पण चुकीचा रस्ता सांगितल्याच्या संशयातून बेदम मारहाण, दात तोडला अन्…


पुणे : समोरच्या व्यक्तीला मदत करणं एका ज्येष्ठ व्यक्तीला चांगलंच महागात पडलं आहे. रस्त्याने जाणाऱ्या दोन तरुणांनी रस्त्याची माहिती विचारली आणि त्यांना माहिती दिल्यानंतर चुकीचा रस्ता सांगितल्याचा संशय घेत ५५ वर्षीय व्यक्तीला बेदम मारहाण केली. इतकंच नाही, तर झाडाच्या फांदीने तोंडावर वार केल्याने त्यांचा अर्धा दातही तुटला. ही धक्कादायक घटना गुरुवारी (१५ ऑक्टोबर) सायंकाळी कान्हूर करमाळा-दावडी रोडवर घडली.

नेमकं काय घडलं?

भाऊसाहेब विठ्ठल दौंडकर (वय ५५, रा. दौंडकरवाडी, शेल पिंपळगाव, ता. खेड) यांना दोन तरुणांनी रस्त्याबाबत विचारणा केली होती. त्यावर दौंडकर यांनी त्यांना रस्त्याची माहिती दिली. मात्र, त्यांनी चुकीची माहिती दिल्याचा संशय आल्याने दोन्ही तरुणांनी त्यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली.

वादाचं रूपांतर मारहाणीत झालं. आरोपींनी दौंडकर यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर झाडाच्या फांदीने त्यांच्या तोंडावर आणि दातांवर वार केले. या हल्ल्यात त्यांचा अर्धा दात तुटला आणि ते गंभीर जखमी झाले.

दोन तरुणांविरोधात गुन्हा दाखल

मारहाणीत जखमी झालेल्या भाऊसाहेब दौंडकर यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. याप्रकरणी त्यांनी उत्तर चाकण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

दौंडकर यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी वैभव दत्तात्रय दौंडकर (रा. कनेसरर, ता. खेड) आणि सुजित दिलीप अमराळे (रा. दावडी, ता. खेड) या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उत्तर चाकण पोलीस करत आहेत.

रस्त्याची माहिती दिल्याच्या कारणावरून एका ५५ वर्षीय व्यक्तीला मारहाण झाल्याने परिसरात या घटनेची चर्चा सुरू आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!