पुण्यात रॅपिडो बाईक टॅक्सीवर पूर्णपणे बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?

पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील रॅपिडो बाईक टॅक्सी सेवेबाबत प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. शासकीय परवानगी मिळेपर्यंत विनापरवाना सुरू असलेली बाईक टॅक्सी सेवा बंद ठेवण्याचे निर्देश पुणे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या (आरटीए) बैठकीत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत. ओला, उबर आणि रॅपिडो या ॲग्रिगेटर कंपन्यांच्या कामकाजाबाबत वाढणाऱ्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीला प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्निल भोसले, पिंपरी-चिंचवडचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल जाधव, वाहतूक पोलीस अधिकारी तसेच रिक्षा आणि कॅब संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
रिक्षा संघटनांचा रॅपिडोविरोधात आक्रमक पवित्रा


महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे संस्थापक अध्यक्ष डॉ. बाबा कांबळे यांच्यासह विविध रिक्षा आणि टॅक्सी संघटनांनी रॅपिडोच्या बाईक टॅक्सी सेवेवर आक्षेप घेतला होता. आवश्यक शासकीय परवानगी न घेता ही सेवा सुरू असल्याचा आरोप संघटनांनी केला.
या सेवेचा परिणाम रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या रोजगारावर होत असल्याची भूमिका संघटनांनी मांडली. तसेच प्रशासनाच्या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करून गुन्हे दाखल करण्याची मागणीही करण्यात आली होती.
ओला, उबर आणि रॅपिडोला भाड्याबाबत महत्त्वाचे निर्देश
आरटीएच्या बैठकीत बाईक टॅक्सी सेवेबरोबरच रिक्षा आणि कॅबच्या भाड्याबाबतही चर्चा करण्यात आली. प्रवाशांकडून शासनाने मान्यता दिलेल्या निर्धारित दरांनुसारच भाडे आकारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
ओला, उबर आणि रॅपिडो या कंपन्यांना चालू महिन्यातील प्रवास आणि भाडेदरांची सविस्तर माहिती १० नोव्हेंबरपर्यंत आरटीएसमोर सादर करावी लागणार आहे. या माहितीच्या आधारे कंपन्यांच्या कामकाजाची आणि नियमांच्या पालनाची पडताळणी केली जाणार आहे.
वाहतूक पोलिसांनाही सूचना देणार
निर्धारित भाडेदरांची अंमलबजावणी योग्य प्रकारे व्हावी, यासाठी शहरातील संबंधित पोलीस ठाण्यांना आवश्यक सूचना दिल्या जाणार आहेत. प्रवाशांकडून निर्धारित दरांपेक्षा अधिक भाडे आकारले जात असल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने या मुद्द्यावर लक्ष केंद्रित केले आहे.
दरम्यान, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये रॅपिडो बाईक टॅक्सी सेवा बंद ठेवण्याच्या निर्देशांची प्रत्यक्षात कशी अंमलबजावणी होते, तसेच संबंधित कंपन्या यावर काय भूमिका घेतात, याकडे आता प्रवासी, रिक्षाचालक आणि टॅक्सीचालकांचे लक्ष लागले आहे.
