पिंपरखेड येथे तेरा वर्षीय मुलावर बिबट्याचा हल्ला; मुलाचा जागीच मृत्यू,परिसरात 20 दिवसात दुसरी घटना, ग्रामस्थांनी पेटवली वनविभागाची गाडी

शिरूर: पिंपरखेड (ता. शिरूर) येथे गेल्या काही दिवसांपासून बिबट्यांच्या हल्ल्याच्या घटना समोर येत आहेत. शिवन्या शैलेश बोंबे (वय साडेपाच) हिचा बिबट्याने केलेल्या हल्ल्यात मागील 15 ते 20 दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. हि घटना ताजी असतानाच पिंपरखेड येथीलच आणखी एका 13 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. आज दुपारी ही घटना उघडकीस आली आहे.या घटनेनंतर संपूर्ण गावावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, रोहन विलास बोंबे (वय-13रा. पिंपरखेड, ता. शिरूर) असे बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. या घटनेमुळेसंतप्त नागरिकांनी व ग्रामस्थांनी वनविभागांची गाडी पेटवली. या मागील काही दिवसांपासून पिंपरखेड व जांबुत या पाच किलोमीटर अंतरामध्ये बिबट्याने केलेल्या हल्ल्यात अनेकांचा बळी गेला आहे. बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांची संख्या 50 हून अधिक आहे. बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून जनजीवन विस्कळीत झाले असून वनविभागाविरोधात शेतकऱ्यांतून संतापाचा उद्रेक झाला आहे.
पिंपरखेड परिसरात शुक्रवारी (17 ऑक्टोंबर) सायंकाळी शेतात काम करत असलेल्या प्रेरणा नरेंद्र बोंबे, विद्यार्थिनी कल्याणी गाढवे व सुलोचना वसंत बोबे यांनी प्रसंगावधान राखल्याने बिबट्याच्या हल्ल्यातून थोडक्यात बचावल्या होत्या.दरम्यान, शिवन्या बोंबे या चिमुरडीचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. त्यानंतर काहीच दिवसात पुन्हा बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडल्याने तसेच वनविभागाकडून पिंजरे लावण्याबाबत कोणतीही ठोस कार्यवाही झाली नसल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
