“घड्याळ सोडलं, धनुष्यबाण हाती घेतला… आणि थेट ‘सिल्व्हर ओक’ गाठलं”; आनंद परांजपे यांच्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण


मुंबई : राजकीय वर्तुळात सध्या चर्चेचा विषय ठरलेले शिवसेना नेते आनंद परांजपे यांनी शिवसेनेत पुनरागमन केल्यानंतर थेट ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतल्याने नव्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकत त्यांनी पुन्हा एकदा शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर लगेचच झालेल्या या भेटीकडे राजकीय वर्तुळातून उत्सुकतेने पाहिले जात आहे.

आनंद परांजपे हे मुळचे शिवसैनिक म्हणून ओळखले जातात. शिवसेनेतून राजकारणाची सुरुवात केल्यानंतर त्यांनी नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तब्बल १४ वर्षे त्यांनी राष्ट्रवादीत काम केले. पक्षातील विविध राजकीय घडामोडींमध्ये ते सक्रिय राहिले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर त्यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला पाठिंबा दिला होता. मात्र गेल्या काही महिन्यांपासून ते पक्षात नाराज असल्याच्या चर्चा रंगू लागल्या होत्या.

परांजपे यांनीही विविध कार्यक्रमांतून अप्रत्यक्षपणे नाराजीचे संकेत दिले होते. अखेर त्यांनी राष्ट्रवादीची साथ सोडत पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर राजकीय समीकरणांवर नव्याने चर्चा सुरू झाली.

दरम्यान, शिवसेनेत पुनरागमन झाल्यानंतर आनंद परांजपे यांनी अचानक ‘सिल्व्हर ओक’वर जाऊन शरद पवार यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना आणखी वेग आला आहे. ही केवळ सदिच्छा भेट असल्याचे सांगितले जात असले तरी, राष्ट्रवादीतून बाहेर पडण्यामागील कारणांवरून अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

विशेष म्हणजे, अजित पवार गटात सक्रिय असताना अचानक घेतलेल्या या निर्णयामागे नेमके कोणते राजकीय गणित आहे, याबाबत चर्चा रंगली आहे. काही राजकीय जाणकारांच्या मते, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि बदलती राजकीय समीकरणे लक्षात घेऊन परांजपे यांनी हा निर्णय घेतला असावा.

राजकीय प्रवासात शिवसेना ते राष्ट्रवादी आणि पुन्हा शिवसेना असा पूर्ण वर्तुळ पूर्ण करणाऱ्या आनंद परांजपे यांच्या या हालचालीमुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!