३३ लाखांचे कर्ज की कौटुंबिक आघात? वडोदऱ्यात आईसह दोन मुलांचा मृत्यू; घटनास्थळी तीन चिठ्ठ्या सापडल्या

वडोदरा : गुजरातमधील वडोदरा जिल्ह्यात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आयुर्वेदिक रुग्णालयाच्या संचालिका आरतीबेन सोनी, त्यांचा मुलगा नीळकंठ आणि मुलगी झलक यांचे मृतदेह त्यांच्या राहत्या घरात आढळून आले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांकडून मृत्यूमागील कारणांचा तपास सुरू आहे.

घरात आढळले तिघांचे मृतदेह
मिळालेल्या माहितीनुसार, घराचा दरवाजा उघडल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तिन्ही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. अतिरिक्त पोलीस आयुक्त जी. बी. बभनिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, शवविच्छेदन अहवालात तिघांचाही मृत्यू गळफासामुळे झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

घटनास्थळी तीन चिठ्ठ्या सापडल्या
पोलिसांनी घराची झडती घेतली असता तीन चिठ्ठ्या आढळून आल्या. या चिठ्ठ्यांमध्ये आर्थिक व्यवहार आणि पैशांशी संबंधित उल्लेख असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी या चिठ्ठ्यांसह तिघांचे मोबाईल फोनही जप्त केले असून ते फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

रुग्णालयात तोटा, कुटुंबावर ३३ लाखांचे कर्ज
आरतीबेन सोनी यांनी पतीच्या निधनानंतर सुमारे दीड वर्षांपूर्वी ओल्ड पादरा रोड परिसरात ‘जैप्स हेल्थ केअर’ नावाने आयुर्वेदिक रुग्णालय सुरू केले होते. मुलगा नीळकंठ आणि मुलगी झलक यांच्या मदतीने त्या रुग्णालयाचा कारभार सांभाळत होत्या. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून रुग्णालयाला आर्थिक नुकसान होत असल्याची माहिती आहे.

प्राथमिक चौकशीत या कुटुंबावर सुमारे ३३ लाख रुपयांचे कर्ज असल्याचे समोर आले आहे. कारचे दोन हप्तेही थकले होते. कर्जाची परतफेड करण्यासाठी राहते घर विकण्याबाबत चर्चा सुरू असल्याचेही सांगितले जात आहे.
कुटुंबावर आधीपासूनच मानसिक ताण?
आरतीबेन यांच्या कुटुंबात यापूर्वी आई-वडील, भाऊ आणि पती अशा जवळच्या व्यक्तींचे निधन झाले होते. या घटनांमुळे त्या मानसिक तणावातून जात असल्याची माहिती तपासात समोर येत आहे. त्यातच व्यवसायातील नुकसान आणि आर्थिक अडचणींमुळे कुटुंबावरील ताण वाढला होता का, याचाही तपास पोलीस करत आहेत.
फॉरेन्सिक अहवालानंतर मृत्यूचे गूढ उलगडणार
पोलिसांनी घटनास्थळावरून मिळालेल्या चिठ्ठ्या आणि मोबाईल फोन फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीकडे पाठवले आहेत. आर्थिक अडचणींचा या घटनेशी संबंध आहे का, तसेच अन्य कोणता दबाव किंवा घातपाताचा प्रकार होता का, या सर्व शक्यतांचा तपास सुरू आहे. व्हिसेरा आणि फॉरेन्सिक अहवाल आल्यानंतरच या प्रकरणातील महत्त्वाचे तपशील स्पष्ट होणार आहेत.
