संजय राऊतांवरील विधान अखेर नितेश राणेंच्या अंगलट? मानहानी प्रकरणात दुसरे वॉरंट जारी; आता न्यायालयाच्या भूमिकेकडे लक्ष!


मुंबई : राज्याचे मंत्री आणि भाजप नेते नितेश राणे यांच्या अडचणीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यात न्यायालयाने राणे यांच्याविरोधात पुन्हा वॉरंट जारी केले आहे. यावेळी मुंबईतील त्यांच्या शासकीय निवासस्थानाच्या पत्त्यावर वॉरंट पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सातत्याने न्यायालयात गैरहजर राहिल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

या प्रकरणाची पार्श्वभूमी मे २०२३ मधील आहे. त्यावेळी पत्रकार परिषदेत नितेश राणे यांनी संजय राऊत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा केला होता. येत्या दोन-तीन आठवड्यांत, म्हणजेच १० जूनपूर्वी राऊत राष्ट्रवादीत प्रवेश करतील, असे ते म्हणाले होते. त्यांच्या प्रवेशाबाबत बैठका सुरू असल्याचा दावाही राणे यांनी केला होता. अजित पवार यांना राष्ट्रवादीतून बाहेर काढण्याच्या अटीवर राऊत पक्षप्रवेशास तयार असल्याचेही त्यांनी म्हटले होते. या विधानांवर आक्षेप घेत संजय राऊत यांनी माझगाव न्यायालयात नितेश राणे यांच्याविरोधात मानहानीची याचिका दाखल केली.

या खटल्याच्या सुनावणीसाठी राणे वारंवार अनुपस्थित राहिल्याने न्यायालयाने यापूर्वी त्यांच्या कणकवली येथील निवासस्थानाच्या पत्त्यावर वॉरंट जारी केले होते. मात्र, गेल्या तीन महिन्यांपासून कणकवली पोलिसांकडून या वॉरंटची अंमलबजावणी झालेली नसल्याचा मुद्दा राऊत यांच्या वकिलांनी न्यायालयासमोर मांडला. त्यानंतर न्यायालयाने आता मुंबईतील शासकीय निवासस्थानाच्या पत्त्यावर नव्याने वॉरंट काढल्याचे वृत्त आहे.

या घडामोडीमुळे राणे यांना न्यायालयात हजर राहण्याबाबतचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. वॉरंटनंतर ते न्यायालयात उपस्थित राहणार का, तसेच या कारवाईबाबत त्यांची भूमिका काय असेल, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, या नव्या वॉरंटबाबत नितेश राणे यांची प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही. न्यायालयीन प्रक्रियेत पुढे काय घडते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!