चांदी 5 लाखांचा टप्पा पार करणार, तर सोन्याचे दर 1.87 लाखांवर जाणार? 2027 साठी मोठा अंदाज जाहीर

पुणे : गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात मोठ्या प्रमाणात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. अलीकडे या दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतीत घसरण झाल्याने ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, ही घसरण तात्पुरती ठरू शकते, असा अंदाज बाजारातील जाणकारांकडून व्यक्त केला जात आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनचे (IBJA) सचिव सुरेंद्र मेहता यांनी सोन्या-चांदीच्या भविष्यातील दरांबाबत महत्त्वाचा अंदाज व्यक्त केला आहे.
त्यांच्या अंदाजानुसार, 2027 च्या अखेरपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव 6,200 डॉलर प्रति औंस, तर चांदीचा भाव 180 डॉलर प्रति औंसपर्यंत पोहोचू शकतो. या दरांनुसार भारतीय बाजारात सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 1.87 लाख रुपयांच्या पुढे जाऊ शकते. तर चांदीचा भाव प्रति किलो 5,45,100 रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.


सध्या सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार सुरूच

IBJA सचिव सुरेंद्र मेहता यांच्या मते, आगामी काही काळ सोन्या-चांदीच्या किमतींवर दबाव कायम राहू शकतो. जागतिक बाजारपेठेत या मौल्यवान धातूंची मागणी वाढण्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे सध्याच्या दरघसरणीकडे पाहून गुंतवणूकदारांनी घाईघाईने निर्णय घेऊ नये, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

2027 अखेर सोनं-चांदी किती महागणार?
सुरेंद्र मेहता यांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, 2027 च्या अखेरपर्यंत सोन्याचा दर 6,200 डॉलर प्रति औंस आणि चांदीचा दर 180 डॉलर प्रति औंसपर्यंत पोहोचू शकतो. भारतीय रुपयांमध्ये विचार केल्यास सोन्याचा भाव 10 ग्रॅमसाठी 1.87 लाख रुपयांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. तर चांदीचा दर प्रतिकिलो 5.45 लाख रुपयांपर्यंत पोहोचू शकतो. मात्र, जागतिक बाजारातील परिस्थिती आणि विविध आर्थिक घडामोडींनुसार प्रत्यक्ष दरांमध्ये बदल होऊ शकतो.
सोन्या-चांदीच्या किमती का घसरत आहेत?
सोन्या-चांदीच्या दरातील घसरणीमागे अनेक जागतिक कारणे असल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये कच्च्या तेलाच्या किमतीतील बदल आणि अमेरिकेतील व्याजदरांबाबत असलेली अनिश्चितता महत्त्वाची आहे. अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्ह आगामी काळात व्याजदरांबाबत काय निर्णय घेणार, याकडे बाजाराचे लक्ष लागले आहे.
विशेषतः डिसेंबर महिन्यातील फेडरल रिझर्व्हच्या धोरणात्मक निर्णयाकडे गुंतवणूकदारांचे लक्ष आहे. या निर्णयाचा परिणाम सोन्या-चांदीच्या दरांवर होण्याची शक्यता आहे.
धनत्रयोदशी-दिवाळीत सोन्या-चांदीची विक्रमी खरेदी
दरम्यान, सोन्या-चांदीच्या किमतीत झालेल्या घसरणीचा फायदा घेत ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केली. धनत्रयोदशी आणि दिवाळीदरम्यान देशात 61 ते 62 टनांहून अधिक सोन्याची विक्री झाल्याचा अंदाज आहे. याच काळात चांदीची विक्रीही 330 ते 340 टनांपर्यंत पोहोचली.
किमतीतील घसरण, लग्नसराईचा हंगाम आणि आगाऊ बुकिंग करण्याकडे ग्राहकांचा वाढता कल यामुळे सोन्या-चांदीच्या खरेदीला चालना मिळाली. त्यामुळे सध्या दरात चढ-उतार सुरू असले तरी भविष्यातील किमतींबाबत बाजारात मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत.
