‘अजितदादांच्या जाण्याने विलीनीकरणालाही पूर्णविराम!’ सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितलं; सुनेत्रा पवारांच्या भूमिकेने राष्ट्रवादीच्या राजकारणात नवा ट्विस्ट


मुंबई : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा एकत्र येणार का, या प्रश्नावर गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र या चर्चांना आता खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट शब्दांत पूर्णविराम दिला आहे. अजित पवार हयात असतानाच दोन्ही पक्षांच्या विलीनीकरणाबाबत चर्चा झाली होती. मात्र त्यांच्या निधनानंतर हा विषय आपल्या मनातून आणि पक्षाच्या पातळीवरही संपल्याचं त्यांनी जाहीर केलं. दुसरीकडे, सुनेत्रा पवार यांनाही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणं सध्या मान्य नसल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून समोर आली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या भविष्यातील राजकीय वाटचालीबाबत नव्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

‘अजितदादा होते तोपर्यंतच चर्चा’; सुप्रिया सुळेंनी भूमिका केली स्पष्ट

विलीनीकरणाच्या चर्चांवर पत्रकार परिषदेत बोलताना सुप्रिया सुळे यांनी नाराजी व्यक्त केली. या विषयावर वारंवार प्रश्न विचारले जात असल्याचा कंटाळा आल्याचंही त्यांनी सांगितलं. अजित पवार हयात असताना दोन्ही पक्षांच्या एकत्र येण्याबाबत चर्चा झाली होती. त्यासाठी तारीखही निश्चित करण्यात आली होती. पक्षातील पदाधिकारी आणि अजित पवार यांच्यात यासंदर्भात चर्चा झाल्याचे व्हिडीओही दाखवण्यात आले होते, असं सुळे यांनी स्पष्ट केलं.

मात्र, अजित पवार यांच्या निधनाच्या दिवशीच विलीनीकरणाच्या विषयाला पूर्णविराम मिळाल्याचं त्यांनी सांगितलं. त्यानंतर अजित पवार गटाकडून विविध विधाने करण्यात आली, तरी आपल्या पक्षाने त्यावर कोणतीही प्रतिक्रीया देत प्रत्युत्तर दिलं नसल्याचंही त्यांनी नमूद केलं. पुढील राजकीय वाटचालीबाबत जे काही ठरलं होतं, ते अजितदादांसोबतच ठरलं होतं, असं सांगत काही निर्णय भावनिक पातळीवरही घेतले जातात, अशी भूमिका त्यांनी मांडली.

यापुढे विलीनीकरणाच्या मुद्द्यावर आपण बोलणार नसल्याचंही सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सत्तेत जाण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचं त्यांनी ठामपणे सांगितलं.

सुनेत्रा पवारांना दोन्ही पक्ष एकत्र नकोत? सूत्रांचा मोठा दावा

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भूमिका वेगळी असल्याची माहिती समोर आली आहे. विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचं विलीनीकरण झाल्यास अजित पवार गटाच्या स्वतंत्र राजकीय अस्तित्वावर परिणाम होऊ शकतो, अशी चिंता सुनेत्रा पवार यांना आहे. त्यामुळे सध्या तरी दोन्ही पक्ष एकत्र येण्यास त्यांची मान्यता नसल्याचं सांगितलं जात आहे.

महत्त्वाचं म्हणजे, सुनेत्रा पवार यांनी ही भूमिका महायुतीतील राज्यातील प्रमुख नेत्यांपर्यंत पोहोचवल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. मात्र शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील दुसरा राष्ट्रवादी पक्ष स्वतंत्र घटक म्हणून महायुतीत सहभागी होऊन राष्ट्रीय लोकशाही आघाडीत आला, तर त्याला विरोध नसेल, अशी भूमिका असल्याची माहितीही समोर आली आहे.

विलीनीकरणाऐवजी स्वतंत्र राजकीय वाटचालीचा पर्याय?

दोन्ही पक्षांच्या विलीनीकरणाबाबत निर्माण झालेल्या अडचणी लक्षात घेता, शरद पवार गटाकडूनही विलीनीकरणाऐवजी स्वतंत्र पक्ष म्हणून सत्तेत सहभागी होण्याच्या पर्यायावर चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र याबाबत अधिकृत निर्णय किंवा घोषणा झालेली नाही.

एकीकडे सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्या निधनानंतर विलीनीकरणाचा विषय संपल्याचं स्पष्ट केलं आहे, तर दुसरीकडे सुनेत्रा पवार यांच्या भूमिकेबाबत समोर आलेल्या माहितीनं राजकीय चर्चांना नवं वळण दिलं आहे. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादींच्या भविष्यातील राजकीय समीकरणांबाबत उत्सुकता वाढली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!