राष्ट्रवादीच्या राजकारणात नवे समीकरण? विलिनीकरणाची चर्चा थांबली, शरद पवार NDA सोबत जाणार? चर्चांना वेग


पुणे : राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून जोर धरत होती. मुंबई, पुणे, बारामती आणि दिल्लीपर्यंत या चर्चांची रंगत वाढली होती. मात्र, दोन्ही पक्ष एकत्र येण्याबाबत अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही.

त्यातच आता राष्ट्रवादीच्या राजकारणात एक नवा ट्विस्ट समोर आला आहे. विलिनीकरणाऐवजी शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस थेट भाजपच्या नेतृत्वाखालील NDA मध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

विशेष म्हणजे, दोन्ही पक्षांचे विलिनीकरण न करताच शरद पवारांचा पक्ष स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवून NDA मध्ये सहभागी होऊ शकतो, असा दावा केला जात आहे. आगामी हिवाळी अधिवेशनापूर्वी विशेष अधिवेशन बोलावून महिला विधेयक आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयक मंजूर करण्याच्या हालचालींच्या पार्श्वभूमीवर या चर्चांना अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. या विधेयकांसाठी भाजपला आवश्यक बहुमताची गरज असल्याने राजकीय समीकरणांची चर्चा रंगू लागली आहे.

सुनेत्रा पवारांच्या कार्यालयाकडून आमदारांशी संपर्क?

दरम्यान, सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही विलिनीकरणाच्या शक्यतांची चाचपणी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या कार्यालयाकडून काही आमदारांशी संपर्क साधण्यात आल्याचे सांगितले जात आहे. विलिनीकरण झाल्यास पक्षाची स्थिती काय असेल, वरिष्ठ नेत्यांचे राजकीय अस्तित्व, पक्षाची बांधणी, नेतृत्व आणि जबाबदाऱ्यांचे वाटप कसे असेल, याबाबत आमदारांची मते जाणून घेतल्याची चर्चा आहे.

राष्ट्रवादीत तिसरा गट निर्माण होणार?

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही ज्येष्ठ नेते नाराज असल्याच्या चर्चा यापूर्वीही समोर आल्या होत्या. अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर पक्षातील अंतर्गत मतभेद उघडपणे समोर आले. याच पार्श्वभूमीवर काही वरिष्ठ नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली होती.

या घडामोडींमुळे सत्ताधारी राष्ट्रवादीमध्ये आणखी एक गट निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पक्षातील नाराज नेत्यांचा एक गट शरद पवार यांच्या पक्षासोबत जाण्याच्या विचारात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मात्र, या संभाव्य राजकीय हालचालींबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

शरद पवार NDA सोबत जाणार? सुप्रिया सुळेंच्या विधानाने चर्चांना पूर्णविराम?

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र पक्ष म्हणूनच NDA मध्ये सहभागी होण्याचा पर्याय तपासत असल्याची चर्चा आहे. दुसरीकडे, खासदार सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी दिल्लीत अजित पवार यांच्या निधनानंतर विलिनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम मिळाल्याचे स्पष्ट केले होते.

मात्र, त्याचदरम्यान सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ यांच्यात बैठक झाल्याची माहितीही समोर येत आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास केंद्रातील राजकारणात महत्त्वाची पदे मिळण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.

एकीकडे विलिनीकरणाच्या चर्चा थंडावल्याचे चित्र असताना दुसरीकडे NDA मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांनी राजकीय वातावरण तापले आहे. मात्र, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची पुढील भूमिका काय असेल, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे आगामी काही दिवसांत राष्ट्रवादीच्या राजकारणात कोणते नवे समीकरण तयार होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!