तुळजापुरात कुलस्वामिनीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाला उत्साहात प्रारंभ,जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते घटस्थापना…


तुळजापूर: महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाला आज, आश्विन शुक्ल प्रतिपदेच्या मुहूर्तावर, भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली. जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष किर्ती किरण पुजार यांच्या हस्ते दुपारी १२ वाजता मंत्रोच्चार आणि “आई राजा उदो-उदो”च्या गजरात विधिवत घटस्थापना करण्यात आली, आणि नऊ दिवसांच्या उत्सव सोहळ्याला प्रारंभ झाला.

सोमवारी पहाटेपासूनच तुळजापुरात धार्मिक विधींना सुरुवात झाली. देवीची सिंहासनावर प्रतिष्ठापना केल्यानंतर दुपारच्या घटस्थापना सोहळ्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली. परंपरेनुसार, छत्रपती शिवाजी महाराजांनी अर्पण केलेल्या जमिनीतील ‘वावरी’ मातीचा वापर करून आणि धाकटे कुंभार कुटुंबीयांकडून आलेल्या कलशात गोमुख व कल्लोळ तीर्थाचे पवित्र जल भरून घटस्थापना करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी यांच्या हस्ते देवीला पहिली नागवेलीच्या पानांची माळ अर्पण करण्यात आली आहे.

नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासूनच तुळजापूर नगरी भाविकांच्या गर्दीने फुलून गेली आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातून हजारो भाविक आपल्या कुलस्वामिनीच्या दर्शनासाठी दाखल झाले आहेत. भाविकांच्या सोयीसाठी मंदिर संस्थान, जिल्हा प्रशासन, पोलीस, नगरपरिषद आणि आरोग्य विभाग यांनी विशेष व्यवस्था केली आहे. स्वच्छता, पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यावर प्रशासनाकडून विशेष लक्ष दिले जात आहे.

या मंगलमय सोहळ्यासाठी मंदिर व्यवस्थापक माया माने, महंत तुकोजी बुवा, महंत चिलोजी बुवा, पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे कदम, विपिन शिंदे, अनंत कोंडो यांच्यासह अनेक मान्यवर, पुजारी आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!