संतोष देशमुख हत्याकांडातील फरार आरोपी कृष्णा आंधळे तृतीयपंथीयांच्या वेशात? आता धक्कादायक माहिती आली समोर..

बीड : येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही पोलिसांना सापडला नाही. यामुळे पोलिसांच्या तपासाच्या कामावर प्रशचिन्ह उपस्थित केलं जात आहे. त्याच्या फरार असण्यामागे अनेकदा वेगवेगळे तर्क वितर्क लावले जातात.
काहींनी कृष्णा आंधळे जिंवत आहे की नाही याबाबत देखील शंका व्यक्त केली होती. त्याला मारण्यात आल्याचे सांगितले जात आहे. आता सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी मस्साजोग येथे जाऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली, त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेबाबत मोठं विधान केलं आहे.
याबाबत तृप्ती देसाई म्हणाल्या, मध्यंतरी मला एक फोन आला होता, त्यावेळी देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी आंधळे हा महाराष्ट्र आणि कर्नाटक बॉण्ड्रीवरती तृतीय पंथीयांच्या वेशात असू शकतो असं समोरच्या व्यक्तीनं मला सांगितलं, असल्याचं देसाईंनी म्हटलं आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
त्यांनी मला हेही सांगितलं की, बीड जिल्ह्यातल्या अनेक तृतीय पंथीयांसोबत त्याचे चांगले संबंध होते. त्यामुळे निश्चितच तृतीय पंथीयांसोबत त्यांचा वेश धारण करून एखाद्या वस्तीमध्ये तो असू शकतो आणि ते आपण पोलिसांना सांगावं असा मला फोन आला होता. असेही त्यांनी सांगितले आहे.
त्यामध्ये तथ्य आहे की नाही यामुळे मी त्या संदर्भात कोणाशी बोलले नाही. या प्रकरणात लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे आणि आरोपींना फाशी झाली पाहिजे. मी देशमुख कुटुंबातील सगळ्यांना भेटले त्यांचं सर्वांचं एकच सांगणं आहे, त्यांना तातडीनं न्याय मिळाला पाहिजे. आईने तर मला सांगितलं की, जसं माझ्या मुलाला त्यांनी तडफडून मारलं तसं कायद्यानुसार माझ्यासमोर आरोपींना देखील तडफडून मारलं पाहिजे.
अनेक ठिकाणी अशा घटना होतात, त्या मिटवल्या जातात, लपवलल्या जातात. सत्तेच्या माजावर, पैशाच्या माजावर. मात्र, हे प्रकरण सगळ्यांनी उचलून धरलं, म्हणून हे प्रकरण इथपर्यंत पोहोचलं आहे. फास्टट्रॅक कोर्टात सुद्धा अनेक केसेस जातात. मात्र, वर्षानुवर्षे त्यांना देखील न्याय मिळत नाही, याबाबत कडक पाऊले उचलली पाहिजेत.