खानवडी शाळेचं उद्घाटन आणि 5 दिवसांतच कारवाई! प्रभारी शिक्षणाधिकारी ‘बळी’

पुणे: पुणे जिल्हा परिषदेत मोठी खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे सुरू करण्यात आलेल्या CBSE पॅटर्नवरील जोती सावित्री जिल्हा परिषद शाळेच्या उद्घाटनानंतर अवघ्या पाच दिवसांतच एका शिक्षण अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

शाळेबाबत चुकीची माहिती दिल्याचा ठपका ठेवत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी पुरंदरचे प्रभारी गट शिक्षणाधिकारी
गोविंद लाखे यांना १६ एप्रिल रोजी निलंबित केले. विशेष म्हणजे, या शाळेचे उद्घाटन ११ एप्रिल २०२६ रोजीच झाले होते.
गोविंद लाखे हे मूळतः शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत होते. गट शिक्षणाधिकारी पद रिक्त असल्याने त्यांच्याकडे प्रभारी पदभार देण्यात आला होता. मात्र, शाळेच्या संदर्भात चुकीची माहिती सादर केल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. या घटनेमुळे जिल्हा परिषद प्रशासनात एकच खळबळ उडाली असून, शिक्षण विभागाच्या कामकाजावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी लाखे यांच्यावर महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवा (शिस्त व अपील) नियम १९६४ मधील नियम ३(१) अंतर्गत निलंबनाची ही कारवाई केली आहे. निलंबित प्रभारी गट शिक्षणाधिकारी गोविंद लाखे यांनी खानवडी येथील जोती सावित्री शाळेला भेट दिल्यानंतर बाहेर चुकीची माहिती बाहेर प्रसारित केली.

यामुळे जिल्हा परिषद संस्थेची बदनामी झाल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. त्यामुळे लाखे यांना निलंबित करण्यात आल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, निलंबनानंतर लाखे यांना वेल्हे पंचायत समिती हे मुख्यालय देण्यात आले असून, गट शिक्षण अधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये, असे या निलंबन आदेशात नमूद करण्यात आले आहे.