केतन हत्या प्रकरण: लॉकअपमध्ये सियाची धक्कादायक मागणी; ऐकून पोलिसही झाले अवाक्

पुणे : लोहगड किल्ल्यावर ट्रेकदरम्यान केतन अग्रवाल यांना शेकडो फूट खोल दरीत ढकलून ठार मारल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या सिया गोयल आणि तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी यांची पोलीस कोठडीत कसून चौकशी सुरू आहे. दोघांनाही 29 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून, चौकशीदरम्यान समोर येणाऱ्या माहितींमुळे या प्रकरणात नवे धक्कादायक खुलासे होत आहेत

आपल्यावर एका व्यक्तीच्या खुनाचा आरोप आहे, त्यासाठी लॉकअपमध्ये आहोत आपण , याबद्दल पश्चाताप, खेद वा खंत याचा जराही लवलेश सियाच्या चेहऱ्यावर नाही. आणि त्याहूनही धक्कादायक गोष्ट म्हणजे लॉकअपमध्ये असतानाही, पोलिसांसमोरच तिने अशी गोष्ट मागितली की सगळेच हैराण झाले. केतनच्या खुनातिलच्या आरोपाखाली, गजाआड असलेल्या सियाने पोलिसांकडे चक्क ‘बीअर’, दारू मागितल्याची माहिती समोर आली आहे.
29 जूनपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आलेल्या सिया आणि चेतनची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. त्या दोघांना वेगवेगळ्या लॉकअपमध्ये ठेवण्यात आलं आहे. मात्र एका जिवंत माणसाचा खून केल्यावरही हे दोघं अतिशय नॉर्मलपणे वागताना दिसले. सियाच्या चेहऱ्यावर तर श्रीमंतीचा माज स्पष्टपणे दिसतो. आपल्याला काही होणार नाही, असा विश्वास तिच्या वागण्यात असून हे सगळं ती अजूनही हलक्यात घेत आहे, तिच्या चेहऱ्यावर जराही चिंता , काळजी दिसली नाही.

सर्वात हादरवणारी गोष्ट म्हणजे सियाने पोलिसांकडे केलेली मागणी. तिला दारू प्यायची प्रचंड सवय असून खुनाच्या आरोपाखील लॉकअपमध्ये असतानाही सियाने पोलिसांकडे थेट बिअरच मागितली, अशी धक्कादायक माहिती उघड झाली आहे. त्यावेळी जे पोलीस कर्मचारी ड्युटीवर होते, तेही सियाची मागणी ऐकून थक्क झाले. मात्र त्यांनी सियाला कडक शब्दांत खडसावलं, त्यानंतर सिया ही शांत झाली.
