नायगावात विदेशी मांगूर माशांवर संयुक्त कारवाई; ३,५०० किलो मासे नष्ट, उरुळीकांचन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

उरुळीकांचन : पेठ, नायगाव येथे शासनाने बंदी घातलेल्या विदेशी मांगूर जातीच्या माशांचे अनधिकृत संवर्धन करण्यात येत असल्याची माहिती प्राप्त झाल्यानंतर ११ जून २०२६ रोजी सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, पुणे आणि उरुळी कांचन पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त पथकाने कारवाई केली.

या कारवाईदरम्यान संबंधित शेततळ्यातून अंदाजे ३,५०० किलो प्रतिबंधित विदेशी मांगूर जातीचे मासे बाहेर काढून कायदेशीर पद्धतीने नष्ट करण्यात आले. याप्रकरणी गणेश शंकर गायकवाड, रा. पेठ, नायगाव, ता. हवेली, जि. पुणे यांच्याविरुद्ध प्रथम खबर क्र. ०१४८/२०२६, दि. ११ जून २०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केंद्र शासनाने प्रतिबंधित विदेशी मांगूर (Clarias Gariepinus) या माशांच्या संवर्धनावर बंदी घातली आहे. या प्रजातीमुळे स्थानिक जैवविविधता व पर्यावरणाला धोका निर्माण होण्याची शक्यता असून, त्याचे सेवन केल्यास मानवी आरोग्यावरही गंभीर परिणाम होऊ शकतात.

त्यामुळे या प्रतिबंधित प्रजातीच्या माशांचे संवर्धन, संगोपन अथवा विक्री कोणीही करू नये. अन्यथा संबंधितांविरुद्ध भारतीय न्याय संहिता, २०२३, अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम, १९८६ तसेच पर्यावरण (संरक्षण) अधिनियम, १९८६ अंतर्गत कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आवाहन सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, पुणे यांनी केले आहे.
