‘आई अजून रडत असते का? तिला सांगा रडू नको…’; अजितदादांचा आवाज कानावर पडताच जय पवार भावुक, डोळ्यांत अश्रू अन् ‘अजित सृष्टी’त गहिवरलं वातावरण


पुणे : गणेशोत्सवाच्या निमित्ताने आंबेगावात उभारण्यात आलेल्या ‘अजित सृष्टी’ या देखाव्याला भेट देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते जय पवार भावुक झाल्याचा प्रसंग समोर आला आहे. कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर जय पवार यांनी मंगळवारी, २२ सप्टेंबर रोजी या देखाव्याला भेट दिली. मात्र, तिथे सुरू असलेल्या अजित पवार यांच्या जुन्या भाषणातील काही शब्द त्यांच्या कानावर पडताच त्यांना वडिलांच्या आठवणींनी गहिवरून आले.

आंबेगावातील स्थानिक कार्यकर्ते युवराज बेलदरे यांनी गणेशोत्सवानिमित्त हा भावपूर्ण देखावा साकारला आहे. दिवंगत अजित पवार यांच्या कार्याला आणि आठवणींना उजाळा देण्याच्या उद्देशाने ‘अजित सृष्टी’ उभारण्यात आली आहे. या देखाव्यात अजित पवार यांच्या आठवणी आणि त्यांच्या सार्वजनिक जीवनातील विविध पैलू मांडण्यात आले आहेत.

जय पवार देखावा पाहण्यासाठी पोहोचले, त्यावेळी पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या आवाजातील जुने भाषण सुरू होते. “आई अजून रडत असते का? तिला सांगा रडू नको म्हणून…” हे शब्द ऐकताच जय पवार काही क्षण स्तब्ध झाले. वडिलांचाच आवाज समोरून संवाद साधत असल्यासारखी भावना झाल्याने त्यांना अश्रू अनावर झाले. त्यांनी डोळे पुसले आणि त्यानंतर भावुक वातावरणात श्री गणेशाची आरती केली.

या प्रसंगावेळी युवराज बेलदरे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. जय पवार यांच्या डोळ्यांत अश्रू पाहून उपस्थितांमध्येही भावुक वातावरण निर्माण झाले. अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा देणाऱ्या या देखाव्याची परिसरात चर्चा होत आहे.

दरम्यान, राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पक्षातील मंत्री, पालकमंत्री, खासदार, आमदार, माजी आमदार आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करण्याचे निर्देश दिले आहेत. नैसर्गिक संकटाच्या काळात शेतकऱ्यांना एकटे न सोडता त्यांच्या अडचणी जाणून घ्याव्यात, नुकसानग्रस्त भागांची पाहणी करावी आणि आवश्यक प्रशासकीय मदतीसाठी पाठपुरावा करावा, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत.

शेतकऱ्यांच्या अडचणीच्या काळात पक्षाचा प्रत्येक पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ता त्यांच्या पाठीशी असल्याचा विश्वास निर्माण करण्याचे आवाहनही सुनेत्रा पवार यांनी केले आहे. त्यामुळे आंबेगावातील ‘अजित सृष्टी’त अजित पवार यांच्या आठवणींनी भावुक झालेला जय पवार यांचा क्षण आणि दुसरीकडे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पक्षाला दिलेल्या सूचना, या दोन्ही घडामोडी चर्चेत आल्या आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!