जपानचे वाणिज्य दूतावास अधिकारी यागी कोजी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घेतली भेट, औद्योगिक विषयावर केली चर्चा…

मुंबई : जपानचे वाणिज्य दूतावास अधिकारी यागी कोजी यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी आर्थिक विकास, नवीन संधी यांसारख्या विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. यावेळी जपानी राज्यात जपानी गुंतवणूक वाढवण्यासह, उद्योगक्षेत्रासमोरील अडचणी दूर करण्यासंदर्भात सविस्तर चर्चा झाली.
उद्योग, आर्थिक क्षेत्रांबरोबरंच दोन्ही सामाजिक,सांस्कृतिक सहकार्य वाढविण्यावरही चर्चेत भर देण्यात आला. यावेळी अजित पवार म्हणाले, मुंबई, पुण्यासह राज्यात विविध ठिकाणी कार्यरत जपानी कंपन्यांना भेडसावणाऱ्या प्रश्नांना सोडविण्यास राज्य शासन प्राधान्य देईल. चांगले रस्ते, पुरेशी वीज, आवश्यक पाणी, सुरक्षित वातावरण आदी पायाभूत सुविधा पुरवण्याची जबाबदारी शासनाची आहे.
पुण्याच्या औद्योगिक परिसरातील रस्त्यांची दुरुस्ती करण्यात येईल. सणसवाडी ते पिंपळे जगताप या रस्त्यासाठी ८० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तिथे भूसंपादनाची प्रक्रिया सुरू असून पावसाळ्यानंतर या रस्त्याचे काम सुरू होईल. जिथे तातडीने रस्तादुरुस्ती आवश्यक आहे तेथे काँक्रीटच्या रस्त्याचे काम पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने तातडीने सुरू करावे, असेही अजित पवार म्हणाले.
तसेच ते म्हणाले, भारत आणि जपान नैसर्गिक मित्र असून आध्यात्मिक, सांस्कृतिकदृष्ट्याही दोन्ही देशांचं वेगळं नातं आहे. भारताच्या औद्योगिक प्रगतीत, पायाभूत सुविधांच्या निर्मितीत जपानची भूमिका महत्वाची राहिली आहे. भारतात जपाननं मोठी औद्योगिक गुंतवणुक केली आहे. यामध्ये राज्यासह पुण्यात अनेक कंपन्या आहेत.
राज्याच्या औद्योगिक, आर्थिक, सामाजिक प्रगतीत, रोजगारनिर्मितीत मोलांचं योगदान देणाऱ्या या कंपन्यांच्या समस्यांचे निराकरण करुन त्यांच्यासाठी उद्योगपुरक वातावरण निर्माण करणं शासनाची जबाबदारी आहे. यापुढील काळात उद्योग, आर्थिक क्षेत्रातील सहकार्यासोबतच सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातही भारत आणि जपान यांच्यातील सहकार्य वाढविण्यासाठी प्रयत्न केले जातील.
यावेळी राज्याच्या नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव तथा विकास आयुक्त डॉ. राजगोपाल देवरा, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख उपस्थित होते. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात ही भेट आयोजित करण्यात आली होती.