सुनीता विल्यम्स यांची पृथ्वीवर परतण्याची वेळ अखेर ठरली! आता नासाने दिली महत्वाची माहिती….

गेले नऊ महिने अंतराळ स्थानकामध्ये अडकून पडलेल्या भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बॅरी विल्मोर यांच्या परत येण्याचा मुहूर्त अखेर समोर आला आहे. त्यांची पृथ्वीवर परतण्याची तारीख निश्चित करण्यात आली आहे. या आधी ते दोघे बुधवारी रोजी परतणार असल्याचे वृत्त होते.
असे असताना मात्र आता ‘नासा’ने यासंदर्भात सुधारित वृत्त जाहीर केले आहे. अमेरिकेची अंतराळ संस्था ‘नासा’ने सांगितले आहे की, सुनीता विल्यम्स, बुच विल्मोर, एक अमेरिकन आणि एक रशियन अंतराळवीर मंगळवारी सायंकाळी ६ वाजता फ्लोरिडाच्या किनाऱ्यावरील स्पेसएक्सच्या ड्रॅगन यानावर उतरू शकतात. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
यापूर्वी ते बुधवारी पृथ्वीवर परततील असे वृत्त होते. स्पेसएक्सचे ड्रॅगन क्राफ्ट अंतराळयान शनिवारी, १५ मार्चला चार अंतराळवीरांना घेऊन आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर गेल्या नऊ महिन्यांपासून अंतराळ स्थानकात अडकून पडले आहेत. यामुळे अनेकांनी भीती व्यक्त केली होती.
गेल्या वर्षी जूनमध्ये बोईंगच्या स्टारलाइनर अंतराळयानातून दोघेही अंतराळात पोहोचले होते; परंतु स्टारलाइनर अंतराळयानात तांत्रिक बिघाडामुळे दोघेही परत येऊ शकले नव्हते. दरम्यान साठ वर्षांच्या सुनीता यांना वेगवेगळ्या प्रकारच्या उड्डाणांचा तीन हजार तासांहून अधिक अनुभव आहे. त्यांचे शिक्षण व अनुभव पाहून अंतराळ मोहिमेसाठी त्यांची निवड झाली.
त्यानंतर त्यांनी अंतराळवीर म्हणूनही अनेक महत्त्वपूर्ण मोहिमांत सहभाग घेतला. गेल्या नऊ महिन्यांत अमेरिकेतही या दोन अंतराळवीरांच्या मुद्द्यावरून मोठे राजकारण झाले. नवे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी माजी अध्यक्ष जो बायडेन हे दोघांना परत आणण्यासाठी पावले उचलत नसल्याची टीका केली आणि सहकारी एलन मस्क यांच्यावर ती जबाबदारी सोपविली होती.