पारा घसरणार, पाऊस बरसणार! पुण्यासह राज्यात हवामानात मोठा बदल, ‘या’ दिवशी पावसाचा इशारा….


पुणे : कडाक्याच्या उन्हामुळे हैराण झालेल्या पुणेकरांसाठी अखेर दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरातील कमाल तापमानात झालेली वाढ आणि वाढता उकाडा यापासून लवकरच आराम मिळण्याची शक्यता आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील काही दिवसांत पुण्यातील तापमानात घट होणार असून विजांच्या कडकडाटासह हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना उष्णतेपासून काही प्रमाणात दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

शुक्रवारी (१७ एप्रिल) पुणे शहरात कमाल तापमान ४० अंश सेल्सिअस नोंदवले गेले, तर किमान तापमान १८.७ अंश सेल्सिअस इतके होते. सकाळपासूनच कडाक्याचे ऊन जाणवत असल्याने दुपारच्या वेळी रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळाला. मात्र, हवामान विभागाच्या अंदाजानुसार शनिवारी (१८ एप्रिल) तापमानात किंचित घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पुढील ३ ते ४ दिवसांत पुण्याच्या हवामानात मोठे बदल पाहायला मिळणार आहेत. हवामान विभागाच्या माहितीनुसार, सोमवार ते बुधवार (२० ते २२ एप्रिल) या कालावधीत पुण्यात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. या दरम्यान मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह २ ते ३ मिमी इतक्या हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

राज्यातील १४ जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा…

केवळ पुणेच नव्हे, तर राज्यातील एकूण १४ जिल्ह्यांमध्ये सोमवारपासून पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र: ठाणे, पालघर, रायगड, पुणे, अहिल्यानगर, सातारा आणि कोल्हापूर या भागांत पावसाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

मराठवाडा आणि विदर्भ: बीड, जालना, परभणी, नांदेड, अकोला, नागपूर आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्येही हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

या पावसामुळे राज्यातील तापमानात घट होण्याची शक्यता असून वाढत्या उकाड्यापासून नागरिकांना काही प्रमाणात का होईना, तात्पुरता दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!