फडणवीसच मोदींचे वारसदार? थेट उपपंतप्रधान होणार? तीन महिन्यांत मोठ्या घडामोडींचा दावा

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उत्तराधिकारी ठरू शकतात आणि त्यांना उपपंतप्रधान करण्याबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघात चर्चा सुरू असल्याचा दावा ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. पुढील तीन महिन्यांत देशाच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता असल्याचेही राऊत यांनी म्हटले आहे.
मीडियाशी संवाद साधताना संजय राऊत यांनी देशातील आणि भाजपमधील अंतर्गत राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. “राजकीय भूगर्भात हालचाली सुरू झाल्या आहेत,” असा दावा त्यांनी केला. भूकंपापूर्वी जसे छोटे-मोठे धक्के जाणवतात, त्याचप्रमाणे सध्या देशाच्या राजकारणात आणि भाजपच्या अंतर्गत हालचाली सुरू असल्याचे राऊत म्हणाले.

नोव्हेंबर ते जानेवारीदरम्यान मोठ्या घडामोडी?
नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या तीन महिन्यांत देशाच्या राजकारणात मोठे बदल पाहायला मिळतील, असे सूचक विधान राऊत यांनी केले. जानेवारीमध्ये देशाच्या राजकारणात मोठे फेरबदल होऊ शकतात, असा दावाही त्यांनी केला.


फडणवीस यांना उपपंतप्रधान करण्याची आणि त्यांना नरेंद्र मोदी यांचे उत्तराधिकारी बनवण्याची संघाची भूमिका असल्याचे राऊत यांनी म्हटले. मात्र, या दाव्याला संघ किंवा भाजपकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
‘फडणवीसांनी महाराष्ट्रात लोकशाहीची पायाभरणी करावी’
फडणवीस यांना उद्देशून राऊत यांनी महाराष्ट्रातील लोकशाही व्यवस्थेबाबतही भाष्य केले. केंद्रातील सध्याच्या राजकीय परिस्थितीतून धडा घेऊन फडणवीस यांनी महाराष्ट्रात लोकशाही मजबूत करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे ते म्हणाले.
सरकारपासून काही जण दूर जाण्याचा प्रयत्न करत असल्याचाही दावा राऊत यांनी केला. मोठ्या राजकीय आणि आर्थिक पाठबळानंतरही जनतेचा विरोध वाढू शकतो, असे ते म्हणाले.
ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मोठा मोर्चा
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी होणाऱ्या मोर्चाबाबतही संजय राऊत यांनी माहिती दिली. दोन ठाकरे बंधूंच्या पुढाकाराने हा मोर्चा पुढे जात असून विविध पक्षांना त्यासाठी आमंत्रित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, डावे पक्ष, शिवसेना आणि मनसेसह विविध पक्षांशी चर्चा झाल्याचा दावा राऊत यांनी केला. ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मोठा मोर्चा काढण्यात येणार असून त्याची तयारी पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले.
‘मोदींना जावं लागेल’, राऊतांचा दावा
कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला माध्यमांमध्ये मिळालेल्या प्रसिद्धीचाही राऊत यांनी उल्लेख केला. सरकारविरोधातील आंदोलनांना माध्यमांमध्ये जागा मिळत असल्याने देशातील राजकीय वातावरण बदलत असल्याचे संकेत मिळत असल्याचे ते म्हणाले.
दरम्यान, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाबाबतही राऊत यांनी मोठा दावा केला. मोदी आणि अमित शाह यांची त्यांच्या पक्षात आणि संघात परिस्थिती खराब असल्याचा दावा करत मोदींना पदावरून जावे लागेल, असे ते म्हणाले. तसेच, त्याआधी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.
