IPS सदानंद दाते NIA चे नवे महासंचालक


मुंबई : IPS सदानंद दाते यांच्यावर खूप मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. NIA चे डायरेक्टर जनरल म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवल्यानंतर सोशल मीडियावर त्यांना शुभेच्छा येत आहेत.

दिनकर गुप्ता NIA चे महासंचालक होते. ते ३१ मार्च रोजी निवृत्त होत असल्याने त्यांच्या जागी सदानंद दाते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदानंद दाते यांच्याकडे महाराष्ट्र एटीएसचे प्रमुख म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली होती.

सदानंद दाते हे १९९० च्या बॅचचे महाराष्ट्र केडरमधील आयपीएस अधिकारी आहेत. अतिशय कुशल अधिकारी अशी त्यांची ओळख आहे. दाते सध्या महाराष्ट्राचे दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख आहेत. यापूर्वी त्यांनी मिरा भायंदर, वसई, विरार आयुक्तालयाचे आयुक्त, मुंबई गुन्हे शाखेचे सहआयुक्त अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत.

२६/११ च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात त्यांनी धडाडीची कामगिरी बजावली होती. कामा हॉस्पिटल येथे दहशतवाद्यांनी ओलीस ठेवलेल्या महिला व मुलांची सुटका दाते यांच्यामुळे होऊ शकली होती. त्याबद्दल त्यांना राष्ट्रपती पदकही मिळाले होते. दाते यांची ओळख अत्यंत चिकाटीचे अधिकारी अशी आहे. मुंबईतील आर्थिक गुन्हे शाखेत काम करत असताना ते सकाळी साडे आठ ते रात्री साडे नऊ पर्यंत कार्यालयात असायचे. मिरा भायंदर, वसई-विरार हे आयुक्तालय पूर्ण उभे करण्याची जबाबदारी त्यांनी सांभाळली होती.

सदानंद दाते यांनी पुणे विद्यापीठातून डॉक्टरेट केली आहे आणि ते मुळचे पुण्याचे आहेत. ते मागील ३० वर्षाहून अधिक काळ पोलीस सेवेत कार्य़रत आहेत. पोलीस सेवेतल्या विविध अनुभवांवर त्यांनी ‘वर्दीतील माणसांच्या नोंदी’ हे पुस्तक लिहिलं आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!