मुंबईत पावसाचा धडाका; ‘या’ 5 जिल्ह्यांना पुढील 72 तास अतिमुसळधार पावसाचा इशारा


मुंबई : गेल्या काही दिवसांपासून तीव्र उकाडा आणि दमट हवामानाचा सामना करणाऱ्या मुंबईकरांना अखेर दिलासा मिळाला आहे. मुंबई शहर, उपनगरांसह नवी मुंबई परिसरात सोमवारी पहाटेपासून विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून नागरिकांना उष्णतेपासून मोठा दिलासा मिळाला आहे.

रविवारी पहाटे काही भागांत हलका पाऊस पडला होता. मात्र त्यानंतर पुन्हा कडक ऊन पडल्याने नागरिकांची निराशा झाली होती. आज मात्र पहाटेपासून सुरू झालेल्या दमदार पावसामुळे मुंबई आणि परिसरातील वातावरण पूर्णपणे बदलले आहे.

पाच जिल्ह्यांसाठी हवामान विभागाचा इशारा

भारतीय हवामान विभागाने मुंबईसह कोकण किनारपट्टीवरील भागांसाठी महत्त्वाचा इशारा जारी केला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांमध्ये पुढील 72 तास मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.

प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून सखल भागांमध्ये पाणी साचण्याची तसेच वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दक्षिण मुंबईत पहाटेपासून ढगांच्या गडगडाटासह पावसाचा जोर अधिक असल्याचे दिसून आले.

मान्सूनच्या प्रगतीला वेग

जागतिक स्तरावर निर्माण झालेल्या अनुकूल हवामान प्रणालीमुळे दक्षिण-पश्चिम मान्सूनच्या पुढील वाटचालीला वेग मिळाला आहे. 23 जूनच्या सुमारास मान्सून महाराष्ट्रासह तेलंगणा, ओडिशा, झारखंड, बिहार आणि छत्तीसगडच्या आणखी काही भागांत सक्रिय होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

पंजाब ते बिहारदरम्यान पसरलेल्या मोसमी द्रोणीय रेषेसह उत्तर गुजरातपासून अरबी समुद्रापर्यंत कार्यरत असलेल्या चक्राकार वाऱ्यांच्या प्रणालीमुळे मान्सूनला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

तापमानात घसरणीचा अंदाज

या हवामान प्रणालीच्या प्रभावामुळे राज्यातील कमाल तापमानात पुढील काही दिवसांत 2 ते 3 अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उकाड्याने त्रस्त नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मात्र कोकण आणि मुंबईच्या तुलनेत विदर्भातील अनेक भागांना अद्याप दमदार पावसाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. विदर्भात आज आणि उद्या उष्णतेची लाट तसेच दमट हवामान कायम राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. याशिवाय मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्येही उष्ण हवामानाचा प्रभाव पुढील काही काळ कायम राहू शकतो.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!