महागाईचा भडका! गॅस-पेट्रोल पाठोपाठ वीजेची दरवाढ होणार, सर्वसामान्यांची डोकेदुखी वाढली…

मुंबई : पेट्रोल-डिझेलच्या वाढलेल्या किमतींमुळे महागाईचा सामना करणाऱ्या नागरिकांना आता नवीन आर्थिक वर्षात आणखी आव्हानांना तोंड द्यावे लागणार आहे. गॅस सिलिंडर आणि वीज यांसारख्या अत्यावश्यक गोष्टींच्या किमतीतील वाढीमुळे सर्वसामान्यांना आर्थिक फटका बसत आहे. नुकतीच गॅस सिलिंडरच्या किमतीत ५० रुपयांची वाढ झाली आहे, तर विजेच्या दरातही प्रतियुनिट ६० पैशांची वाढ होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.
या दरवाढीमुळे सामान्य नागरिक, विशेषतः गृहिणींवर आर्थिक ताण वाढला आहे. यामुळे मोठा आर्थिक भार वाढणार आहे. महावितरणने १ एप्रिलपासून विजेच्या दरात प्रतियुनिट ६० पैशांची वाढ करण्याचे परिपत्रक जारी केले आहे. उन्हाळ्याच्या काळात वीज वापर आधीच वाढलेला असताना, या दरवाढीमुळे ग्राहकांच्या वीज बिलात मोठी भर पडणार आहे.
गॅस सिलिंडरच्या किमतीत झालेल्या ५० रुपयांच्या वाढीमुळे आता सामान्य ग्राहकांना ८२० रुपयांऐवजी ८७० रुपये मोजावे लागणार आहेत. उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना ५०० रुपये किमतीचा सिलिंडर आता ५५० रुपयांना घ्यावा लागेल. ही वाढ गरीब कुटुंबांसाठी मोठा झटका आहे.
सध्या अनेक नागरिक वीज बचतीसाठी प्रयत्न करत असले, तरी काही ठिकाणी वीज वापर गरजेचा आहे. यामुळे बिलाचा आकडा वाढतच आहे. मध्यमवर्गीय आणि कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबांना याचा सर्वाधिक फटका बसणार आहे. वैशाली काळे यांनी निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
दरम्यान, इंधनाच्या किमती वाढल्याने वाहतूक, ऊर्जा आणि उत्पादन क्षेत्रावर परिणाम होतो, ज्यामुळे अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तू आणि सेवांचे दरही वाढतात. या सर्व गोष्टींचा थेट परिणाम सामान्य नागरिकांच्या खिशावर होतो. यामुळे महागाई कमी करण्याचे आवाहन सरकारपुढे आहे.