मोठी राजकीय घडामोड! भाजप–शिवसेना पुन्हा आमने-सामने; जळगाव विधान परिषद जागेवरून संघर्ष तीव्र, ‘स्वतंत्र लढाई’चे संकेत

जळगाव : राज्यातील आगामी विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीत पुन्हा एकदा अंतर्गत संघर्ष उफाळून आला असून भाजप आणि शिवसेना शिंदे गटामध्ये जळगावच्या एका महत्त्वाच्या जागेवरून जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. या वादामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले असून स्थानिक पातळीपासून ते राज्याच्या नेतृत्वापर्यंत चर्चा रंगू लागल्या आहेत.

जळगाव विधान परिषद मतदारसंघावरून दोन्ही पक्षांमध्ये दावा-प्रतिदावा सुरू आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी या जागेवर शिवसेनेचा हक्क असल्याचा ठाम दावा करत भाजपने समजुतीने एक पाऊल मागे घ्यावे, अशी स्पष्ट मागणी केली आहे. “लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने पूर्ण ताकदीने भाजपच्या उमेदवारांसाठी काम केले. त्यामुळे आता ही जागा शिवसेनेला मिळणे योग्य आहे,” असे ते म्हणाले.
पाटील यांनी पुढे बोलताना स्थानिक राजकीय समीकरणांचाही उल्लेख केला. त्यांच्या मते, जळगावमध्ये शिवसेनेची संघटनात्मक ताकद मजबूत असून पालकमंत्री तसेच अनेक आमदार शिवसेनेसोबत आहेत. त्यामुळे ही जागा शिवसेनेच्या वाट्याला यावी, असा त्यांचा आग्रह आहे.

या वादाला आणखी धार देत किशोर पाटील यांनी मैत्रीपूर्ण लढतीचाही पर्याय मांडला आहे. जागेचा तिढा सुटत नसेल तर दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवावी, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले आहे. यामुळे महायुतीतील समन्वयावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दरम्यान, भाजप नेत्यांवरही त्यांनी अप्रत्यक्ष टीका केली आहे. जळगावमधील काही नेते उमेदवारीबाबत आधीच घोषणा करत असल्याचा उल्लेख करत “जागा अजून निश्चित नाही आणि उमेदवार आधीच ठरवले जात आहेत,” असा टोला त्यांनी लगावला.
दुसरीकडे, शिवसेनेतीलच काही नेत्यांच्या भूमिकेमुळेही या वादात नवा ट्विस्ट आला आहे. गुलाबराव पाटील यांच्या हालचालींवर लक्ष वेधत, त्यांच्या भूमिकेमुळे अंतर्गत मतभेद अधिक तीव्र होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. उमेदवारीसाठी कुटुंबातील सदस्याचे नाव पुढे आणले जात असल्याच्या चर्चांनाही या पार्श्वभूमीवर उधाण आले आहे.
या संपूर्ण घडामोडींमुळे महायुतीतील जागावाटपाचा तिढा पुन्हा एकदा समोर आला असून वरिष्ठ पातळीवर दिल्लीमध्ये चर्चांना वेग आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर या विषयाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
महायुतीतील दोन प्रमुख पक्ष एकाच जागेवर ठाम असल्याने आता हा वाद चर्चेने मिटतो की प्रत्यक्ष निवडणुकीत ‘मैत्रीपूर्ण लढत’ पाहायला मिळते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. स्थानिक कार्यकर्त्यांमध्येही या घडामोडींमुळे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
आगामी काही दिवसांत या जागेवर अंतिम निर्णय होणार की राजकीय ताकदीची थेट चाचणी घेतली जाणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.