मुलीच्या कमाईवर जगतोय! असे म्हटल्यामुळे रागाच्या भरात वडिलांनी भारतीय टेनिसपटू राधिका यादवला झाडल्या गोळ्या, घटनेने खळबळ…

नवी दिल्ली : हरियाणातील गुरुग्राममध्ये एका बांधकाम व्यावसायिकाने टेनिसपटू मुलगी राधिका यादव (वय. २५) हिच्या पाठीत गोळी झाडून तिची हत्या केली. राधिका स्वयंपाकघरात असताना वडिलांनी त्यांच्या परवानाधारक रिव्हॉल्व्हरने तिच्यावर तीन गोळ्या झाडल्या. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली. दरम्यान, राधिकाच्या वडिलांनी आपला गुन्हा कबुल करत हत्येचे कारण सांगितले आहे.

ही घटना हरियाणाच्या गुरुग्राममधील सुशांत लोक फेज-२ या पॉश सोसायटीमध्ये घडली. या सोसायटीच्या फ्लॅट क्रमांक E-157 मध्ये २५ वर्षीय टेनिसपटू राधिका यादव आपल्या कुटुंबासोबत राहत होती. राहत्या घरातचं वडिलांनी तिच्यावर गोळ्या घातल्या. ज्यात तिचा जागेवरचं मृत्यू झाला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच आरोपी वडिलांना घटनास्थळावरून अटक करण्यात आली आहे.
तसेच हत्येत वापरलेले परवानाधारक रिव्हॉल्व्हर देखील जप्त करण्यात आले आहे. राधिकाच्या काकांनी केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केलायं. पोलिसांनी या घटनेत आरोपी वडिलांची चौकशी केली असता त्यांनी या हत्येची कबुली दिली आहे. त्यांनी चौकशीत हत्येचे कारणही सांगितले आहे. पोलिसांनी याबाबत माहिती दिल्यानंतर आता सर्वांनाचं धक्का बसला आहे.

जेव्हा मी दूध आणायला जायचा तेव्हा लोक मला टोमणे मारायचे. ते म्हणायचे की तुझी मुलगी खूप पैसे कमवत आहे. तू मजा करत आहेस, तू तुझ्या मुलीच्या कमाईवर खर्च करत आहेस. तू आणि तुझे कुटुंब खूप मजा करत आहेस. लोकांच्या या बोलण्यामुळे मला खूप त्रास होत होता. मी राधिकाशीही याबद्दल अनेकदा बोललो होतो. मी लोकांचे टोमणे ऐकून कंटाळलो होतो.

मी राधिकाला अकादमी बंद करायला सांगितले होते. आमचे कुटुंब श्रीमंत आहे, कोणतीही अडचण येणार नाही. यावर राधिका म्हणाली होती की, लोक काय म्हणतात याची मला पर्वा नाही. खेळाने माझे करिअर बनवले आहे, मग त्यातून पैसे कमवण्यात काय चुकीचे आहे,” असं दीपकने सांगितले.
दीपकने चौकशीत सांगितले की, गुरुवारीही मी राधिकाला अकादमीत न जाण्यास सांगितले होते. पण, तिने ऐकले नाही. ती मला टोमणे मारू लागली. लोकांच्या टोमण्यांमुळे मी खूप अस्वस्थ झालो. अशा परिस्थितीत, जेव्हा मुलीने ऐकले नाही, तेव्हा मी माझ्या परवानाधारक रिव्हॉल्व्हरने तिच्यावर गोळी झाडली.
दरम्यान, पोलिसांनी सांगितले की, ‘दोन वर्षापूर्वी राधिकाच्या खांद्याला गंभीर दुखापत झाली होती. ज्यामुळे तिला प्रॅक्टिस करण्यात अडचण येत होती. आणि म्हणूनच तिने टेनिस अकादमी उघडण्याचा निर्णय घेतला. तिचा हा निर्णय वडिलांना आवडला नाही. कारण गावातील लोक त्यांना टोमणे मारायचे मुलीच्या कमाईवर जगत आहेस. या संतापात त्यांनी मुलीची हत्या केल्याचं कबूल केलं आहे.