उरुळीकांचन येथे १ गावठी पिस्टल, २ काडतुसे व २ कोयते असा शस्त्रसाठा जप्त; एटीएस पुणे ग्रामीण पथकाची कारवाई

उरुळी कांचन : उरळीकांचन ता.हवेली जि.पुणे येथे रेकॉर्डवरील गुन्हेगार भाऊसो उर्फ भावड्या भगवान महाडिक रा.डाळींब ता.दौंड जि.पुणे यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून अवैध शस्त्रसाठा जप्त केल्याची माहिती पुणे ग्रामीण (ए.टी.एस.) दहशतवाद विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ताजीराव मोहिते यांनी दिली.
पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथक हे उरळीकांचन पोलीस स्टेशन परिसरामध्ये गोपनीय माहिती काढत असताना पथकातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक निलेश कदम व महेश गायकवाड यांना बातमीदारामार्फत गोपनीय माहिती मिळाली की उरूळीकांचन पोलीस स्टेशनच्या हद्दीत उरुळीकांचन-डाळिंब रोड, सदानंद बेकरी जवळ ए्क इसम गावठी पिस्टल बाळगून थांबलेला आहे. अशी खात्रीलायक माहिती मिळाली.

त्या अनुषंगाने दहशतवाद विरोधी शाखेचे पथकाने त्या ठिकाणी जाऊन संशयितरत्या मिळून आलेला भाऊसो उर्फ भावड्या भगवान महाडिक, वय ३४ वर्षे सध्या रा.डाळींब रोड, खुडे वस्ती ता.दौंड जि.पुणे मूळ रा.शिंदवणे ता.हवेली जि.पुणे यास पळून जाण्याच्या तयारीत असताना ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी बनावटीचे पिस्टल, दोन जिवंत काडतुसे व दोन कोयते असा एकूण रु. ५१,२००/- किंमतीचा मुद्देमाल मिळून आला.


सदर शस्त्रसाठा विनापरवाना व बेकायदेशीररित्या बाळगल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास ताब्यात घेवून त्याचेविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम ३, ४, २५ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १३५ अन्वये उरुळी कांचन पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर आरोपी भाऊसो महाडीक हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी आयटीआय, बोरी भडक परिसरात त्याचे ५ साथीदारांसोबत जमाव जमवून मारहाण गंभीर दुखापत केल्याबाबत यवत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे. त्याची केस दौंड कोर्ट येथे चालू आहे. त्या गुन्ह्यातील त्याचा साथीदार शुभम उर्फ लल्या लोंढे याच्यावर यापूर्वी उरळीकांचन येथील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या खून प्रकरणी गुन्हा दाखल आहे.
आरोपीने सदरची हत्यारे कशासाठी आणली होती? याबाबतचा अधिक तपास उरुळीकांचन पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक तारडे हे करीत आहेत.
सदरची कारवाई ही पुणे ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री.संदीप सिंह गिल्ल, बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक श्री.गणेश बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली दहशतवाद विरोधी शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ताजीराव मोहिते, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेश गायकवाड, निलेश कदम, रवींद्र जाधव, मोसीन शेख, ओंकार शिंदे, जालिंदर मुळीक यांचे पथकाने केली आहे.
दहशतवाद विरोधी शाखेकडून बेकायदा शस्त्र बाळगणारे, अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध तसेच समाजात दहशत व गुन्हेगारी निर्माण करणाऱ्या प्रवृत्तींविरुद्ध यापुढेही प्रभावी कारवाई मोहीम आखण्यात येणार आहे.