‘आई, मला वाचव…’ लेकीचा मेसेज अन् आईची धावपळ; लाईव्ह लोकेशनवरून बंद घर गाठलं, ४ अल्पवयीन मुलींची सुटका!


कल्याण : कल्याणच्या मलंगगड रोडवरील द्वारली गावठाण परिसरात अल्पवयीन मुलींबाबत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एकाच परिसरातील चार अल्पवयीन मुली बेपत्ता असल्याची माहिती समोर आल्यानंतर खळबळ उडाली. मात्र, यातील एका मुलीने दाखवलेल्या धाडसामुळे आणि तिच्या आईच्या सतर्कतेमुळे पोलिसांना वेळीच कारवाई करता आली.

काही दिवसांपूर्वी यातील एक अल्पवयीन मुलगी अचानक बेपत्ता झाली होती. ती मैत्रिणीकडे किंवा नातेवाईकांकडे गेली असावी, असा सुरुवातीला कुटुंबीयांचा अंदाज होता. मात्र, बराच वेळ उलटूनही ती घरी न परतल्याने आईसह कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला. परिसरात तसेच नातेवाईकांकडे चौकशी करूनही तिचा ठावठिकाणा लागत नव्हता.

दरम्यान, बेपत्ता मुलीने मोबाईलच्या माध्यमातून आईशी संपर्क साधला. एका तरुणाने आपल्याला द्वारली परिसरातील एका बंद घरात जबरदस्तीने डांबून ठेवल्याचे तिने आईला सांगितले. कशीतरी त्या घराच्या खिडकीतून बाहेर पडून एका इमारतीखाली लपल्याचेही तिने आईला कळवले. मुलीने घाबरलेल्या अवस्थेत मदतीची विनंती केल्यानंतर आईने तातडीने तिला आपले लाईव्ह लोकेशन पाठवण्यास सांगितले.

मुलीकडून लोकेशन मिळताच आईने क्षणाचाही विलंब न करता कोळसेवाडी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांचे पथक आणि मुलीचे कुटुंबीय संबंधित ठिकाणी पोहोचले. त्यावेळी पोलिसांनी कारवाई करत चेतन नावाच्या तरुणाला ताब्यात घेतले. त्याच परिसरातून संबंधित मुलीसह आणखी तीन अल्पवयीन मुलींचीही सुखरूप सुटका करण्यात आली.

या घटनेमुळे एका मुलीच्या बेपत्ता होण्यामागे दडलेले धक्कादायक वास्तव समोर आले. चारही मुलींना सुरक्षित ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. मुलींना त्या ठिकाणी नेमके कसे आणण्यात आले, त्यामागे आरोपीचा उद्देश काय होता आणि या प्रकारात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास केला जात आहे.

दरम्यान, कोळसेवाडी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयिताची चौकशी सुरू केली असून प्रकरणातील सर्व बाजू तपासल्या जात आहेत. एका आईने प्रसंगावधान राखून पोलिसांना माहिती देणे आणि मुलीकडून मिळालेले लाईव्ह लोकेशन तातडीने पोलिसांपर्यंत पोहोचवणे यामुळे चारही अल्पवयीन मुलींची वेळेत सुटका होऊ शकली. या घटनेने कल्याण परिसरात मात्र मोठी खळबळ उडाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!