‘सुपर एल निनो’चा धोक्याचा इशारा; ७५ वर्षांतील सर्वात भीषण हवामान बदलामुळे भारतात दुष्काळाचे सावट


मुंबई : प्रशांत महासागरात ‘एल निनो’ पूर्णपणे सक्रिय झाल्याची अधिकृत घोषणा अमेरिकी हवामान संस्था NOAA च्या क्लायमेट प्रेडिक्शन सेंटरने (CPC) केली आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, यंदाचा एल निनो हा १९५० नंतरचा सर्वात तीव्र म्हणजेच गेल्या ७५ वर्षांतील भीषण स्वरूपाचा असू शकतो. या घडामोडीमुळे भारतीय उपखंडासह महाराष्ट्रात मान्सूनवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात असून दुष्काळाचे सावट अधिक गडद झाले आहे.

सीपीसीच्या ताज्या अहवालानुसार, प्रशांत महासागरातील न्यूट्रल हवामान स्थिती संपून एल निनोने आता सक्रिय व रौद्र रूप धारण करण्यास सुरुवात केली आहे. चालू वर्षाच्या डिसेंबरपर्यंत तो ‘सुपर एल निनो’ स्वरूपात पोहोचू शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विशेष म्हणजे, हा प्रभाव केवळ चालू वर्षापुरता मर्यादित नसून फेब्रुवारी २०२७ पर्यंत त्याचा परिणाम जाणवण्याची शक्यता ९० टक्क्यांहून अधिक असल्याचेही सांगण्यात आले आहे.

भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, यंदाचा मान्सून सरासरीच्या सुमारे ९० टक्के राहू शकतो. काही भागांत पावसाचे प्रमाण सामान्य राहिले तरी अनेक ठिकाणी मोठी तफावत दिसून येण्याची शक्यता आहे. यामुळे प्रादेशिक पातळीवर पावसाचे असमान वितरण होऊन काही भागांत तीव्र दुष्काळी परिस्थिती निर्माण होऊ शकते.

तज्ज्ञांच्या मते, मान्सूनच्या प्रवासात यंदा मोठे खंड पडण्याची शक्यता आहे. जुलै आणि ऑगस्ट या महत्त्वाच्या महिन्यांत पावसात दीर्घ विश्रांती (ब्रेक) येऊ शकते. सध्या मान्सूनची प्रगती मंदावलेली असून त्यामागे एल निनोचा प्रभाव कारणीभूत असल्याचे मानले जात आहे.

हवामान प्रणालीवर परिणाम करणारे MJO (Madden Julian Oscillation) क्षेत्रही अपेक्षित दिशेने सरकत नसल्याने मान्सून सक्रिय होण्यास विलंब होत आहे. त्यातच आखाती प्रदेशातून येणाऱ्या कोरड्या वाऱ्यांचा प्रभाव वाढल्याने मान्सूनच्या पुढील वाटचालीत अडथळे निर्माण झाले आहेत.

हवामान शास्त्रानुसार, प्रशांत महासागरातील समुद्रपृष्ठ तापमान सरासरीपेक्षा २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढल्यास ‘सुपर एल निनो’ मानला जातो. यंदा काही भागांत हे तापमान ३ अंशांपेक्षा जास्त वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या पार्श्वभूमीवर शेती नियोजन, जलसाठा व्यवस्थापन आणि पाणी बचतीबाबत प्रशासनाने तसेच शेतकऱ्यांनी आतापासूनच सतर्क राहण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. आगामी मान्सून हंगाम अत्यंत अनिश्चित आणि आव्हानात्मक ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!