सिंहगडावर स्वातंत्र्यदिनाचा जल्लोष अन् अचानक ‘दे दणा दण’! दोन गट भिडले; एकाने दगड उचलला अन्…


पुणे : स्वातंत्र्यदिनाची सुट्टी एन्जॉय करण्यासाठी सिंहगड किल्ल्यावर गेलेल्या पर्यटकांसाठी दिवसाचा आनंद काही क्षणांतच गोंधळात बदलला. १५ ऑगस्टला किल्ल्यावर पर्यटकांची तुफान गर्दी झाली होती. याच गर्दीत महिला-मुलींच्या छेडछाडीवरून वाद झाल्याची चर्चा असून, त्यानंतर दोन गटांमध्ये अक्षरशः ‘दे दणा दण’ राडा झाल्याचे समोर आले आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने सिंहगडावरील पर्यटकांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे दरवाजा परिसरात गर्दीमुळे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. मोठ्या संख्येने पर्यटक किल्ल्यावर दाखल झाल्याने परिसरात मोठी गर्दी झाली होती. याच दरम्यान काही तरुणांमध्ये वादाची ठिणगी पडली. महिला आणि मुलींच्या छेडछाडीवरून हा वाद सुरू झाल्याची माहिती समोर येत आहे. सुरुवातीची बाचाबाची वाढत गेली आणि काही वेळातच दोन्ही गटांमध्ये मारामारी सुरू झाली.

व्हायरल व्हिडिओमध्ये काही तरुण एकमेकांना मारहाण करताना दिसत आहेत. परिस्थिती इतकी चिघळली की एका तरुणाने मोठा दगड उचलून दुसऱ्या गटातील तरुणाच्या दिशेने भिरकावल्याचेही व्हिडिओत दिसत आहे. या झटापटीत काही तरुणांच्या डोक्याला दुखापत झाल्याचे सांगण्यात येत आहे. गर्दीतच हा प्रकार घडल्याने आजूबाजूला असलेल्या पर्यटकांमध्येही काही काळ भीती आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

विशेष म्हणजे स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी कुटुंबीय, महिला आणि लहान मुलांसह अनेक पर्यटक सिंहगडावर आले होते. अशा गर्दीच्या पर्यटनस्थळी छेडछाड किंवा किरकोळ कारणांवरून वाद होऊन त्याचे हाणामारीत रूपांतर होणे चिंताजनक असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आलेल्या नागरिकांना सुरक्षित वातावरण मिळावे, यासाठी गर्दीच्या दिवसांमध्ये अधिक प्रभावी बंदोबस्त आणि नियोजनाची गरज असल्याचे बोलले जात आहे.

सिंहगडावरील घटनेबरोबरच पुण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्नही पुन्हा चर्चेत आला आहे. शहरातील विविध रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहतूक कोंडी आणि अपघात होत आहेत. त्यामुळे पुणे पोलीस आयुक्तांनी वाहतूक पोलिसांना खड्ड्यांची माहिती महापालिकेला देण्याच्या सूचना केल्या आहेत. विशेषतः ज्या रस्त्यांवर वारंवार कोंडी होते, त्या मार्गांवरील खड्डे तातडीने दुरुस्त करून घेण्यासाठी महापालिकेकडे पाठपुरावा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

दरम्यान, श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिर परिसरातील वाढत्या गर्दीचा मुद्दाही चर्चेत आला आहे. हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी भविष्यातील गर्दी लक्षात घेऊन दगडूशेठ गणपतीची मूर्ती शनिवार वाड्यात बसवण्याचा पर्याय सुचवला आहे. पोलीस ठाणे स्थलांतरित झाल्यानंतर तेथील दुकानदार, फुल बाजारातील व्यावसायिक आणि वाढणारी वाहतूक कोंडी यांचे काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. शनिवार वाडा, लाल महाल किंवा नदीपात्र यांसारख्या पर्यायी जागांचा विचार करता येईल का, अशी सूचनाही त्यांनी केली.

सिंहगडावरील राड्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता महिला-मुलींची सुरक्षा, पर्यटकांची गर्दी आणि पर्यटनस्थळांवरील कायदा-सुव्यवस्था यावर प्रशासनाने ठोस नियोजन करण्याची गरज व्यक्त होत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!