‘कर्जमाफीचा गाजर, शेतकऱ्यांच्या हातात फक्त अटी!’; रोहित पवारांचा एल्गार, 12 जूनपासून पंढरीतून सरकारविरोधात बेमुदत लढ्याची घोषणा

पंढरपूर : राज्यातील शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून सरकारच्या नव्या कर्जमाफी योजनेविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) आक्रमक झाली आहे. सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीतील जाचक अटींमुळे लाखो शेतकरी लाभापासून वंचित राहणार असल्याचा आरोप करत आमदार रोहित पवार यांनी थेट आंदोलनाचा इशारा दिला आहे. 12 जूनपासून पंढरपूर येथे बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली असून, यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

राज्य सरकारने ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना’ जाहीर करण्याची तयारी सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत दोन लाख रुपयांपर्यंतचे पीककर्ज माफ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र या योजनेत घालण्यात आलेल्या अटी आणि निकषांमुळे प्रत्यक्षात मोठ्या संख्येने शेतकरी लाभापासून दूर राहणार असल्याची टीका विरोधकांकडून होत आहे.
याच पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. गेल्या तीन-चार वर्षांपासून दुष्काळ, अवकाळी पाऊस, उत्पादन खर्चातील वाढ आणि बाजारातील अस्थिरतेमुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या कोलमडला आहे. अशा परिस्थितीत सरकारने दिलेली कर्जमाफी ही शेतकऱ्यांना दिलासा देणारी नसून फसवणूक करणारी असल्याचा आरोप त्यांनी केला.

रोहित पवार यांनी सोशल मीडियावरूनही आपली भूमिका स्पष्ट करत सरकारने कर्जमाफीतील सर्व जाचक अटी तात्काळ रद्द करून सरसकट कर्जमाफी जाहीर करावी, अशी मागणी केली. अन्यथा विठ्ठलाच्या साक्षीने सुरू होणारे आंदोलन राज्यव्यापी करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

दरम्यान, या योजनेतील सर्वाधिक वादग्रस्त बाब म्हणजे यापूर्वी कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना यावेळी पूर्ण लाभ मिळणार नसल्याची अट. 2019 मधील महात्मा फुले कर्जमाफी योजनेचा लाभ घेतलेल्या लाखो शेतकऱ्यांना केवळ मर्यादित मदत मिळण्याची शक्यता आहे. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही ठरावीक मर्यादेपर्यंतच सवलत दिली जाणार असल्याने ग्रामीण भागात नाराजी वाढत आहे.
शेतकरी संघटनांनीदेखील या अटींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. अनेक संघटनांनी ही योजना ‘कर्जमाफी’ नसून ‘कर्जवसुलीची नवी पद्धत’ असल्याची टीका केली आहे. त्यामुळे सरकारवर दबाव वाढताना दिसत आहे.
पंढरपूरच्या भूमीतून सुरू होणाऱ्या या आंदोलनाकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. सरकार या आंदोलनापूर्वी कर्जमाफीच्या अटींमध्ये बदल करणार की संघर्ष आणखी तीव्र होणार, याची उत्सुकता शेतकरी आणि राजकीय वर्तुळात निर्माण झाली आहे. आगामी काही दिवसांत कर्जमाफीचा मुद्दा राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठा संघर्षबिंदू ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.