रात्रीच्या किर्र अंधारात पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल लोहगडावर पोहोचले; केतनला जिथून ढकललं त्या जागेवर गेले अन् उलगडला हत्येचा संपूर्ण घटनाक्रम..


पुणे : पुण्यातील व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा केतन अग्रवाल (वय २५) याच्या हत्येप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांचा तपास वेगाने सुरू असून, या प्रकरणात महत्त्वाची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. मध्यरात्री पोलिसांनी लोहगड किल्ल्यावर जाऊन ‘क्राईम सीन रिक्रिएशन’ करत संपूर्ण घटनाक्रमाची पुनर्रचना केली.

या तपासाची गंभीरता लक्षात घेऊन पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल स्वतः रात्री उशिरा घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तपास पथकासह संपूर्ण परिसराची पाहणी करत घटनास्थळावरील परिस्थितीची माहिती घेतली.

पोलिसांनी केतन अग्रवाल, सिया गोयल आणि चेतन चौधरी लोहगडावर पोहोचल्यापासून ते कथितपणे घटना घडल्याच्या ठिकाणापर्यंतचा संपूर्ण मार्ग पुन्हा तपासला. तिकीटघरावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये तिघे ज्या मार्गाने गेले होते, त्याच मार्गाचा मागोवा घेत पोलिसांनी त्या दरीपर्यंत पाहणी केली, जिथून केतनला खाली ढकलल्याचा आरोप आहे.

तपासादरम्यान आरोपींच्या हालचाली, घटनास्थळावरील भौगोलिक परिस्थिती, उपलब्ध तांत्रिक पुरावे आणि प्रत्यक्ष घटनाक्रम यांचा परस्पर ताळमेळ लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. गुन्हा नेमका कशा पद्धतीने घडला, याचा वैज्ञानिक आणि परिस्थितीजन्य पुरावा मजबूत करण्यासाठी ही प्रक्रिया राबवण्यात आली.

पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी सांगितले की, कोणत्याही गंभीर गुन्ह्याच्या तपासात घटनास्थळाची प्रत्यक्ष पाहणी आणि त्याचे पुनर्निर्माण ही अत्यंत महत्त्वाची कायदेशीर प्रक्रिया असते. घटना ज्या ठिकाणी घडली आणि मृतदेह ज्या ठिकाणी आढळला, त्या दोन्ही ठिकाणांमधील अंतर, भौगोलिक रचना आणि इतर बाबींचा सखोल अभ्यास करण्यात आला आहे.

तपास अधिकाऱ्यांच्या मते, या ‘क्राईम सीन रिक्रिएशन’मधून मिळणारे परिस्थितीजन्य आणि तांत्रिक पुरावे न्यायालयीन प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावतील. आरोपींविरोधातील दोषारोप अधिक भक्कम करण्यासाठी हा तपास निर्णायक ठरू शकतो.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!