लोणी काळभोरमध्ये विषारी ‘दारू नाही तर ताडी’ ; माय -लेकाला अटक, घातक स्फटिक जप्त


लोणी काळभोर : पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये विषारी दारूमुळे मृतांची संख्या वाढत असतानाच लोणी काळभोर पोलिसांनी कारवाई करत मानवी आरोग्यास घातक ठरणारी रासायनिक ताडी तयार करणाऱ्या आई-मुलाला जेरबंद केले आहे. घटनास्थळावरून तयार ताडी, घातक स्फटिक पदार्थ आणि मोबाईल फोन असा मुद्देमाल जप्त करून दोघांना अटक केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार याप्रकरणी सिद्धांत सुरेश भाले (वय २२) व मुक्ताबाई सुरेश भाले (वय ५१, रा. गारुडी वस्ती, शितळादेवी नगर, लोणी काळभोर) यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी महिला पोलीस हवालदार कविता संपत साळवे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात सरकारतर्फे फिर्याद दिली आहे.

अवैध धंद्यांविरोधात विशेष मोहीम सुरू असताना पोलिसांना गारुडी वस्ती येथे एका पत्र्याच्या घरात रासायनिक पदार्थ मिसळून ताडी तयार करून तिची विक्री केली जात आहे. अशी माहिती मिळाली. माहितीची खातरजमा करून सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश बोराटे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी शुक्रवार (२९ मे) रोजी सायंकाळी ५.१५ वाजता कारवाई केली असता सिद्धांत व मुक्ताबाई भाले हे निळ्या रंगाच्या टबमध्ये पिवळसर स्फटिक पदार्थ मिसळून ताडी तयार करताना आढळून आले. पोलिसांनी चौकशी केली असता, जप्त करण्यात आलेला पिवळसर-पांढरा स्फटिक पदार्थ हा एका रमेश नावाच्या व्यक्तीकडून विकत घेतल्याचे आरोपींनी सांगितले. तसेच ४० लिटर पाण्यात या स्फटिकाची एक पुडी मिसळल्यानंतर ४० लिटर ताडी तयार होत असल्याच माहिती त्यांनी पोलिसांना दिली.

घटनास्थळावरील द्रव पदार्थाची आणि स्फटिकांची पाहणी केली असता त्यातून अत्यंत उग्र व आंबट वास येत होता. त्यामुळे हा पदार्थ मानवी आरोग्यास अपायकारक असल्याचा प्राथमिक निष्कर्ष पोलिसांनी नोंदवला आहे. कारवाईदरम्यान पोलिसांनी १६ लिटर तयार ताडी, ५ पिशव्यांमध्ये भरलेला घातक स्फटिक पदार्थ, दोन मोबाईल फोन, असा सुमारे १२ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच ताडी आणि स्फटिक पदार्थांचे नमुने प्रयोगशाळा तपासणीसाठी सीलबंद करण्यात आले. उर्वरित ताडी आणि रसायन जागीच नष्ट करण्यात आले. ताडी तयार करण्यासाठी वापरलेले टब आणि साहित्यही फोडून नष्ट करण्यात आले.

याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये विषारी दारूमुळे अनेक नागरिकांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. अशाच प्रकारचे रासायनिक पदार्थ वापरून दारू तयार केली जात होती का, याचाही तपास आता पोलीस करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!