क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांसाठी महत्त्वाची सूचना! १५ जूनपासून ‘या’ बँकेच्या नियमांत मोठे बदल; जाणून घ्या काय बदलणार


पुणे : क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. खासगी क्षेत्रातील आघाडीची बँक असलेल्या इंडसइंड बँकेने आपल्या क्रेडिट कार्ड नियमावलीत मोठे बदल जाहीर केले असून हे नवे नियम १५ जून २०२६ पासून लागू होणार आहेत. या बदलांचा परिणाम लाखो ग्राहकांच्या खर्च, व्याज आणि शुल्कांवर होणार आहे.

नव्या नियमांनुसार, ज्या ग्राहकांकडून दर महिन्याला संपूर्ण बिलाचा भरणा केला जात नाही आणि फक्त किमान किंवा अंशतः रक्कम भरली जाते, त्यांना अधिक व्याजाचा भार सहन करावा लागू शकतो. थकीत रकमेवर व्याज आकारण्यासोबतच त्यानंतर करण्यात आलेल्या नव्या खरेदी व्यवहारांवरही व्याज लागू होण्याची शक्यता आहे.

तसेच, व्याजमुक्त कालावधीचा लाभ पुन्हा मिळवण्यासाठी ग्राहकांना सलग दोन बिलिंग सायकलमध्ये संपूर्ण थकबाकीची वेळेत परतफेड करावी लागणार आहे. त्यामुळे अतिरिक्त व्याज टाळण्यासाठी प्रत्येक महिन्यात पूर्ण बिल भरण्याचा सल्ला दिला जात आहे.

इंधन खरेदीवरील शुल्कमुक्त मर्यादेतही कपात करण्यात आली आहे. यापूर्वी ₹५०,००० पर्यंतच्या इंधन खरेदीवर अतिरिक्त शुल्क आकारले जात नव्हते. मात्र आता बहुतांश कार्डधारकांसाठी ही मर्यादा ₹३०,००० करण्यात आली आहे. यापेक्षा अधिक खर्च झाल्यास १ टक्के अतिरिक्त शुल्क आणि जीएसटी भरावा लागेल.

वाहतूक सेवांवरील खर्चासाठीही नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. रेल्वे, बस, कॅब बुकिंग, टोल आणि इतर वाहतूक सेवांवर एका बिलिंग सायकलमध्ये ₹४०,००० पेक्षा जास्त खर्च झाल्यास अतिरिक्त शुल्क आकारले जाणार आहे. मात्र हवाई प्रवासाच्या तिकिटांना या नियमातून वगळण्यात आले आहे.

आंतरराष्ट्रीय व्यवहार करणाऱ्या ग्राहकांसाठीही बँकेने डीसीसी (Dynamic Currency Conversion) शुल्कात वाढ केली आहे. बहुतांश स्टँडर्ड कार्डधारकांना आता परकीय चलन व्यवहारांवर १ टक्क्याऐवजी २ टक्के शुल्क आणि त्यावरील जीएसटी भरावा लागणार आहे.

याशिवाय, लेट पेमेंट शुल्काच्या रचनेतही बदल करण्यात आले आहेत. थकबाकीच्या रकमेच्या आधारे विलंब शुल्क आकारले जाणार असून, सामान्य कार्डधारकांना या नव्या नियमांचे पालन करावे लागणार आहे. काही प्रीमियम कार्डधारकांना मात्र या शुल्कांमधून सवलत देण्यात आली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!