महत्वाची बातमी! पालघर-नाशिक हायवे बंद, प्रवासासाठी पर्यायी मार्ग कोणते?

मुंबई : पालघर आणि नाशिक जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. डोंगरदऱ्यांतून मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागल्याने नद्या-नाले तुडुंब भरले असून अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.

या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून पालघर-नाशिकदरम्यानचा राष्ट्रीय महामार्ग (NH-160A) तात्पुरता बंद करण्यात आला आहे. त्यामुळे शेकडो वाहनधारक व प्रवाशांना मोठा फटका बसला आहे.
तसेच विक्रमगड, जव्हार, मोखाडा आणि त्र्यंबकेश्वर परिसरात मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. रस्त्यावर चिखल, पाण्याचा विसर्ग तसेच दरड कोसळण्याचा धोका असल्याने प्रशासनाने वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला. हा मार्ग धार्मिक स्थळे, पर्यटन केंद्रे तसेच व्यापारी व्यवहारासाठी महत्त्वाचा मानला जातो.

मात्र अचानक बंद झाल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. आपत्ती व्यवस्थापन पथके घटनास्थळी दाखल झाली असून अडथळे दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र पावसाचा जोर कमी झाल्यानंतरच रस्ता सुरळीत करण्याचे काम गती घेईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
महत्त्वाचा मार्ग बंद झाल्यानंतर वाहनांना इगतपुरी आणि कसारा मार्गे वळवण्यात येत आहे. त्यामुळे प्रवासाचा कालावधी जवळपास दुपटीने वाढतो आहे. प्रवाशांनी अतिरिक्त वेळ गृहीत धरून प्रवासाचे नियोजन करणे आवश्यक आहे.
दरम्यान, पालघर जिल्ह्यासाठी हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. पुढील काही दिवस मुसळधार पाऊस कायम राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कारणाशिवाय प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे.