शेतकऱ्यांसाठी कामाची बातमी! तुमचं कर्जमाफी यादीतील नाव कस तपसाल? जाणून घ्या…

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात कर्जमाफीची चर्चा सुरू आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजने अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना लवकरच कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. यावर शेतकरी समाधानी नसले तरी याबाबत आता यादी कशी बघायची हे समोर आले आहे.

पुढील आठवड्यापासून लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा होण्याची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. त्याआधी शेतकऱ्यांना आपले नाव लाभार्थी यादीत आहे की नाही, हे सहज तपासता येणार आहे. याबाबत शेतकऱ्यांना माहिती असणे गरजेचे आहे. योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी विविध बँकांकडील पात्र शेतकऱ्यांची माहिती विशेष डिजिटल पोर्टलवर अपलोड केली जात आहे.
यामध्ये लाभार्थ्याला स्वतंत्र युनिक क्रमांक देण्यात येणार आहे. याद्या ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय, संबंधित बँका, विविध सहकारी विकास संस्था, कार्यकारी संस्था, आपले सरकार सेवा केंद्र तसेच ऑनलाइन पोर्टलवर उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यामध्ये आपल्याला नाव बघावं लागणार आहे.

तसेच शेतकऱ्यांना त्यांच्या दिलेल्या मोबाईल क्रमांकावर मेसेजही पाठवण्यात येणार आहे. नाव यादीत नसल्यास किंवा तांत्रिक अडचण आल्यास जिल्हास्तरावर स्थापन करण्यात आलेली स्वतंत्र यंत्रणा मदत करणार आहे. यामुळे याबाबत पात्र शेतकऱ्यांना माहिती मिळेल.

दरम्यान, गेल्या 12 वर्षांतील ही राज्यातील तिसरी मोठी कर्जमाफी योजना ठरणार आहे. आधी 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस सरकारने कर्जमाफी जाहीर केली होती, तर 2019 मध्ये महाविकास आघाडी सरकारने कर्जमुक्ती योजना राबवली होती. आता पुन्हा एकदा कर्जमाफी होत आहे, मात्र शेतकरी नाराज आहेत.