लाडक्या बहिणींसाठी महत्वाची बातमी! सरकार योजना गुंडाळण्याच्या तयारीत? महत्वाची माहिती आली समोर…

मुंबई : सरकारी तिजोरीवर ताण आल्याने लाडकी बहीण योजनेत अनेक बदल केले जात आहेत. या योजनेत सातत्याने नवनवीन निकष लागू करण्यात येत आहेत. या नवीन निकषांनी सरसकट अंमलबजावणीचे आदेश कधीच मागे टाकले आहेत. यामुळे लाडक्या बहिणींची धाकधूक वाढली आहे.

अनेक ठिकाणी या योजनेत काही पुरुषांनी घुसखोरी केल्याचे तसेच शासकीय महिला अधिकाऱ्यांनी योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले. आता सरकारने या योजनेसाठी निकषांची जंत्रीच सुरू केली आहे. लाडकी बहीण योजनेतील बोगसगिरीला चाप लावण्यासाठी सरकार अनेक निर्णय घेत आहे.
आता सरकारने ईकेवायसी अनिवार्य केली आहे. त्यामुळे काही लाडक्या बहिणींना सुद्धा फटका बसण्याची शक्यता आहे. अर्थात ई-केवायसी करण्यासाठी सरकारने मोठी मुदत दिली आहे. कारण आता सणासुदीचे दिवस आहेत. महिलांवरील कामाचा ताण पाहता केवायसी प्रक्रियेसाठी दोन महिन्यांचा कालावधी देण्यात आला.

दरम्यान, पात्र महिलांनी फार काळ ही प्रक्रिया रेंगाळत न ठेवता तातडीने ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करावी. अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे. या प्रक्रियेत लाभार्थी महिलेचे नाव, पत्ता, आधार कार्ड, रेशन कार्ड, उत्पन्नाची माहिती भरावी लागेल. असेही सांगितले आहे.

ही प्रक्रिया लवकरच सुरू होईल. त्यासाठी संकेतस्थळावर लवकरच पॉपअप विंडो सुरू होण्याची शक्यता आहे. योजनेचा हप्ता सुरू राहण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया लवकर पूर्ण करावी लागणार आहे. यामुळे येणाऱ्या काळात या योजनेत अजून काय बदल होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.