हडपसरमधील स्पा सेंटरमध्ये मसाजच्या नावाखाली सुरू होता ‘भलताच’ प्रकार; पोलिसांचा छापा अन् दोन महिलांची सुटका

पुणे : हडपसर परिसरात मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या बेकायदेशीर व्यवसायाचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. स्पा सेंटरच्या आड महिलांना पैशांचे आमिष दाखवून वेश्याव्यवसायात ढकलले जात असल्याचा प्रकार पोलिसांच्या कारवाईत उघडकीस आला. या प्रकरणात दोन महिलांची सुटका करण्यात आली असून, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हडपसरमधील माळवाडी परिसरातील डीपी रस्त्यावर असलेल्या ‘सेव्हन स्पा’मध्ये गैरप्रकार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार 19 ऑगस्ट रोजी सायंकाळी सुमारे पाच वाजता हडपसर पोलिसांनी स्पा सेंटरवर अचानक छापा टाकला. पोलिसांनी केलेल्या तपासात मसाज सेंटरच्या आड वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे समोर आले. कारवाईदरम्यान पोलिसांनी दोन पीडित महिलांची सुटका केली.

या प्रकरणात कपिल उर्फ काफिलउद्दीन आणि स्पाचा व्यवस्थापक आसिफ यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. महिलांना पैशांचे आमिष दाखवून या व्यवसायात ढकलले जात असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले.


पोलीस हवालदार बापू लक्ष्मण लोणकर यांच्या तक्रारीवरून कपिल आणि आसिफ यांच्याविरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा पोलीस तपास करत आहेत.