अवैध क्रशर उद्योग, खाणकाम करणारांना दणका! जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे अधिकाऱ्यांना महत्वाचे आदेश

पुणे : जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांसाठी आयोजित महसूल कार्यशाळेत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी अधिकाऱ्यांना महत्वाचे आदेश दिले आहेत. गेल्या काही महिन्यात अवैध उत्खननावरून जिल्ह्याच्या विविध भागात कारवाई केली आहे. तसेच अवैध क्रशर उद्योगामुळे नागरिकांच्या तक्रारींमध्ये देखील वाढ होत आहे.
यामुळे जिल्ह्यातील अवैध क्रशर उद्योग आणि खाणकामामुळे महसूल विभागाची प्रतिमा मलिन होत आहे. हे तातडीने थांबवावे. हे अवैध क्रशर उद्योग येत्या पंधरा दिवसात तसेच अवैध खाणकाम दोन महिन्यांत बंद करावेत, असे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी यंत्रणेला दिले आहेत, यामुळे यावर येणाऱ्या काळात कारवाई होणार आहे.
तसेच कारवाई केली नाही तर मलाच कारवाई करावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. महसूल विभागाची प्रतिमा मलिन होत असून अशा अवैध क्रशर आणि उत्खननावर तातडीने कारवाई करावी, असा आदेश डुडी यांनी दिला. या सर्व अवैध बाबी १०० टक्के बंद करा, अन्यथा मलाच कारवाई करावी लागेल. ते तुमच्यासाठी योग्य नसेल. त्यामुळे प्रत्येकाने आपापले काम चोखपणे करावे, असा इशाराही डुडी यांनी यावेळी दिला.
सर्वांनी कामात पारदर्शकता वाढवावी असे सांगून सर्वांनी नागरिकांच्या भेटण्याची वेळ निश्चित करावी. त्यासाठी दर सोमवारी व शुक्रवारी कार्यालयातच राहून नागरिकांच्या समस्यांकडे लक्ष पुरवाव्यात असे त्यांनी सांगीतले. यामुळे काही अडचण येणार नाही.
तसेच कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या सेवा ज्येष्ठतेनुसार व उपलब्ध जागांनुसार बदल्या करण्यात येतील. बदल्यांसाठी माझ्याकडे येण्याची आवश्यकता नाही. कर्मचाऱ्यांना समुपदेशन कक्ष सुरू होईल. पदोन्नतीचा प्रश्न मार्गी लागेल. असेही ते म्हणाले.