‘तिने मदत मागितली असती तर मीही केली असती…’; निदा खान प्रकरणात इम्तियाज जलीलांचं वक्तव्य, राज्याच्या राजकारणात नवा वाद


छत्रपती संभाजीनगर : नाशिकमधील कथित ‘कॉर्पोरेट जिहाद’ आणि बेकायदेशीर धर्मांतर प्रकरणामुळे आधीच राज्यातील वातावरण तापलेलं असताना आता एमआयएम नेते इम्तियाज जलील यांच्या एका वक्तव्याने मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. “निदा खान हिने माझ्याकडे मदत मागितली असती तर कदाचित मीही तिला मदत केली असती,” असं वक्तव्य करत जलील यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांच्या या विधानानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांना वेग आला आहे.

निदा खानला आश्रय दिल्याच्या आरोपावरून एमआयएमच्या एका नगरसेवकावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर पालकमंत्री संजय शिरसाट यांनी थेट इम्तियाज जलील यांच्यावर निशाणा साधत त्यांनाही या प्रकरणात सहआरोपी करावं, अशी मागणी केली. या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेत बोलताना जलील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

“निदा खान ही सध्या केवळ आरोपी आहे, दोषी नाही. आरोप आणि दोष सिद्ध होणं यात खूप फरक असतो. कोणावरही आरोप होऊ शकतात, पण ते न्यायालयात सिद्ध होईपर्यंत ती व्यक्ती गुन्हेगार ठरत नाही,” असं जलील म्हणाले. त्यांनी पुढे सांगितलं की, “जर प्रकरण इतकं गंभीर असतं आणि तिचा काही दहशतवादी कारवायांशी संबंध असता तर पोलिसांनी लूकआऊट नोटीस किंवा नॉन-बेलेबल वॉरंट जारी केलं असतं. पण आतापर्यंत तसं काही झालेलं नाही.”

जलील यांनी एफआयआरचा उल्लेख करत सांगितलं की, “एफआयआरमध्ये कम्युनल हेट्रेड आणि धार्मिक भावना दुखावल्याचे आरोप आहेत. पण काही लोक वातावरण असं तयार करत आहेत जणू तिने मोठा गुन्हा केला आहे.” यावेळी त्यांनी माध्यमांना “एफआयआर पूर्ण वाचा आणि मग प्रश्न विचारा,” असंही सांगितलं.

निदा खानबाबत बोलताना जलील म्हणाले, “मी तिची बाजू घेतो कारण प्रत्येकाला न्याय मिळण्याचा अधिकार आहे. मी तिला आधीच स्पष्ट सांगितलं होतं की, जर तुझी चूक असेल तर मी तुझ्या पाठीशी उभा राहणार नाही. पण तू सांगतेस तसं जर प्रकरण असेल तर आम्ही पूर्ण ताकदीने तुझ्यासोबत राहू.”

याचवेळी त्यांनी मोठं विधान करत म्हटलं, “निदा खान हिने माझ्याकडे मदत मागितली असती तर कदाचित मीही तिला मदत केली असती. कारण ती फक्त आरोपी आहे, दोषी नाही.” या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यावर टीका करताना जलील म्हणाले, “मी पालकमंत्र्यांना काडीमात्र भाव देत नाही. मला प्रश्न विचारायचे असतील तर पोलीस आयुक्त विचारतील. मी पोलिसांना शंभर टक्के सहकार्य करेन.”

दरम्यान, निदा खानला न्यायालयातून दिलासा मिळू शकला असता, असा दावाही त्यांनी केला. “ती हायकोर्टात गेली असती तर तिला बेल मिळाला असता. तो प्रत्येक आरोपीचा घटनात्मक अधिकार आहे,” असं जलील म्हणाले.

इम्तियाज जलील यांच्या या विधानामुळे आता राज्यातील राजकारण आणखी तापण्याची शक्यता असून विरोधकांनीही या प्रकरणावर आक्रमक भूमिका घेण्याची चिन्हं दिसत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!