माणिकराव कोकाटे यांच्या जागी विरोधातील आमदार असते तर संध्याकाळीच आमदारकी रद्द झाली असती!! रोहित पवारांनी सगळंच बाहेर काढलं…

पुणे : कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना एका प्रकरणांमध्ये न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा सुनावली. त्यानंतर माणिकराव कोकाटे यांची आमदारकी आणि मंत्रीपद जाणार का याची चर्चा सुरू झाली आहे.
तसेच अर्थात माणिकराव कोकाटे यांनी अपील केले आणि त्यांची शिक्षेला स्थगिती मिळाली. मात्र या विषयावरून विरोधी पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सरकारला लक्ष्य केले आहे. आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत सरकारवर शरसंधान केले आहे.
त्यांनी ट्विट केले आहे की, विरोधी पक्षाच्या आमदाराला न्यायालयाने शिक्षा सुनावली असती तर लोकप्रतिनिधी कायद्याअंतर्गत काल संध्याकाळीच संबंधित आमदाराची आमदारकी रद्द करण्याचे पत्रक निघाले असते, त्यांनी पुढे असेही म्हटले आहे की, ही तत्परता किंवा कुठलेही कायदे सत्ताधाऱ्यांना लागू होत नाहीत, म्हणूनच तर मस्साजोग, परभणी प्रकरण असो वा राहुल सोलापुरकरचे प्रकरण असो तपास कधी पुढे सरकतच नाही.
दरम्यान, गुन्हेगारांना पाठीशी घालत भ्रष्टाचाराला खतपाणी घालून अंतिमतः सत्ता हाच सत्ताधाऱ्यांचा धर्म आणि कर्म असल्याने सत्ताधारी कोणत्याही गुन्हेगारांवर कारवाई करू शकत नाहीत, ही वस्तूस्थिती आहे.