मी मराठी बोलत नाही,दम असेल तर महाराष्ट्रातून काढून दाखवा, प्रसिद्ध अभिनेत्याचं ठाकरे बंधूंना थेट ओपन चॅलेंज…

मुंबई : दोन दिवसापूर्वी उद्योजक सुशील केडिया या उद्योजकाने मी मराठी बोलणार नाही, काय करायचं ते करा, असं म्हणत मनसे प्रमुख राज ठाकरेंना आव्हान दिलं होतं. मात्र, राज ठाकरेंच्या महाराष्ट्र सैनिकांनी त्याला खळखट्याकने प्रत्युत्तर दिल्यानंतर सुशील केडिया याने राज ठाकरेंची माफी मागितली.
दरम्यान, सुशील केडियानंतर आता आणखी एका उत्तर भारतीयाने ठाकरे बंधूंना आव्हान दिले आहे. भोजपुरी अभिनेता दिनेश लाल यादव निरहुआ यांनी थेट उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना उघड आव्हान दिलं आहे.
मी मराठी बोलत नाही. आणि मी सर्वांना चॅलेंज देतो – जर तुमच्यात हिंमत असेल तर मला महाराष्ट्राबाहेर काढून दाखवा! अशा रोखठोक शब्दांत त्यांनी ठाकरे बंधूंना टोला लगावला आहे. यापूर्वी उद्योजक सुशील केडिया यानेही अशाच प्रकारचं वक्तव्य केलं होतं. मात्र त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांकडून झालेल्या तीव्र विरोधामुळे त्याने राज ठाकरेची जाहीर माफी मागितली होती.
त्या पार्श्वभूमीवर आता दिनेश लाल यादव यांचं वक्तव्य वाद निर्माण करत आहे. उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे माध्यमांशी बोलताना निरहुआ म्हणाले, हे देश विविधतेतून एकता दाखवणारा आहे. विविध भाषा आणि संस्कृती आपली ताकद आहेत. कोणी कोणाला भाषेच्या नावावर राज्याबाहेर काढण्याची भाषा करत असेल, तर ते गलिच्छ राजकारण आहे. मी मराठी बोलत नाही, आणि मी उघड आव्हान देतो—जर तुमच्यात धमक असेल तर मला महाराष्ट्रातून बाहेर काढून दाखवा!
दरम्यान, त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करत मराठी भाषेचेही कौतुक केले. मराठी ही फार सुंदर आणि प्रेमळ भाषा आहे, तशीच भोजपुरीसुद्धा आहे. प्रत्येक भाषेचं स्वतःचं सौंदर्य आहे. क्षमता असेल तर सर्व भाषा शिकायला हव्यात, असं ते म्हणाले आहे.