“मुलगा होत नाही म्हणून अवघड जागा जाळून टाकतो…”; उरुळीकांचनमध्ये पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड फेकल्याची संतापजनक घटना


उरुळीकांचन : चारित्र्यावर संशय, मुलगा न झाल्याचा राग आणि त्यातून पत्नीवर अमानुष अत्याचार… पुणे जिल्ह्यातील उरुळीकांचन परिसरातून समोर आलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण राज्य हादरले आहे. “तुला दोन मुलीच आहेत, मुलगा होत नाही,” असे म्हणत एका नराधम पतीने आपल्या २४ वर्षीय पत्नीला बेदम मारहाण केली आणि तिच्या गुप्तांगावर थेट ॲसिड ओतल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. एवढ्यावरच न थांबता आरोपीने जखमी पत्नीला उपचारासाठी दवाखान्यात नेण्याऐवजी तब्बल १५ दिवस घरातच कोंडून ठेवल्याचेही समोर आले आहे.

ही घटना २० एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी साधारण ७ वाजण्याच्या सुमारास उरुळीकांचन (ता. हवेली) परिसरात घडली. पीडित महिलेने अखेर धाडस करत पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर शुक्रवारी (१५ मे) आरोपी पतीविरुद्ध उरुळीकांचन पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी सायंकाळी आरोपी पती दारूच्या नशेत घरी आला. “तू कामावर जातेस, तुझे कोणाशी संबंध आहेत ते सांग,” असा आरोप करत त्याने पत्नीला शिवीगाळ आणि मारहाण सुरू केली. यानंतर संतापाच्या भरात “तुला मुलगा होत नाही, तुझी अवघड जागाच जाळून टाकतो,” अशी धमकी देत त्याने घरातील पोटमाळ्यावर ठेवलेली टॉयलेट साफ करण्यासाठी वापरण्यात येणारी ॲसिडची बाटली खाली आणली.

आरोपीने पत्नीला जोरात खाली ढकलत तिच्या गुप्तांगावर थेट ॲसिड ओतल्याचा आरोप आहे. असह्य वेदनांनी तडफडणाऱ्या पीडितेने बाहेर पळण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपीने दरवाजा आतून बंद करून पुन्हा तिच्यावर लाथाबुक्क्यांनी हल्ला केला. महिलेच्या आरडाओरडीनंतर शेजारी राहणाऱ्या जावेने सासू-सासऱ्यांना फोन केला. त्यानंतर “कोणाला काही सांगितले तर जिवे मारून टाकीन,” अशी धमकी देत आरोपी घरातून फरार झाला.

धक्कादायक बाब म्हणजे, गंभीर जखमी अवस्थेत असतानाही आरोपीने “माझ्याकडे पैसे नाहीत,” असे सांगत पत्नीला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यास नकार दिला. पीडितेला तब्बल १५ दिवस घरातच डांबून ठेवण्यात आले. अखेर शनिवारी (९ मे) सकाळच्या सुमारास आरोपी कामावर गेल्यानंतर पीडित महिलेने आपल्या दोन मुलींना सोबत घेत माहेर गाठले आणि संपूर्ण प्रकार कुटुंबीयांना सांगितला.

यानंतर नातेवाईकांनी तिला उरुळीकांचन पोलीस ठाण्यात आणले. पोलिसांनी तातडीने तिला वैद्यकीय तपासणीसाठी पुण्यातील ससून रुग्णालय येथे पाठवले. उपचारानंतर शुक्रवारी (१५ मे) आरोपी पतीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ अंतर्गत कलम १२४(१), ११५(२), ३५१(२) आणि ३५२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण कांबळे करत असून आरोपीचा शोध सुरू आहे. या अमानुष घटनेमुळे उरुळीकांचन परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!