लाडक्या बहिणींना सर्वात मोठा दिलासा! योजना बंद होणार का? मंत्र्यांनीच दिलं स्पष्ट उत्तर

मुंबई : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याच्या चर्चांना राज्य सरकारकडून पूर्णविराम देण्यात आला आहे. राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांपैकी एक असलेल्या या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा ₹1500 आर्थिक मदत दिली जाते.
या योजनेमुळे लाखो महिलांना आर्थिक आधार मिळत असला, तरी सरकारी तिजोरीवर मोठा आर्थिक भार पडत असल्याने योजना बंद होणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, राज्याचे मंत्री जयकुमार गोरे यांनी यावर स्पष्ट भूमिका मांडत महिलांना मोठा दिलासा दिला आहे.

धाराशिव दौऱ्यावर असताना जयकुमार गोरे यांना लाडकी बहीण योजना आणि शेतकरी कर्जमाफीबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना त्यांनी सांगितले की, लाडक्या बहिणींचा लाभ आणि शेतकरी कर्जमाफी यासाठी मोठा निधी खर्च होत असला तरी राज्य सरकार आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे. राज्याच्या विकासकामांसाठी निधीची कमतरता भासणार नाही आणि कोणत्याही योजनांच्या निधीत कपात केली जाणार नाही. सर्व आर्थिक बाबींचा विचार करूनच सरकारने हे निर्णय घेतले आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.


दरम्यान, ई-केवायसी पूर्ण न झाल्यामुळे अनेक महिलांना योजनेचा ₹1500 चा हप्ता मिळू शकला नव्हता. अशा महिलांसाठी आता मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ई-केवायसीची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आल्याची माहिती दिली आहे.
तटकरे यांच्या माहितीनुसार, पुढील सहा महिन्यांच्या कालावधीत ज्या महिलांची ई-केवायसी प्रलंबित आहे, त्यांना ती पूर्ण करण्याची संधी दिली जाणार आहे. त्यामुळे पात्र महिलांना पुन्हा योजनेचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
याशिवाय, महायुती सरकारने यापूर्वी लाडकी बहीण योजनेतील मासिक आर्थिक मदत ₹1500 वरून ₹2100 करण्याचे आश्वासन दिले होते. याबाबत विचारले असता आदिती तटकरे म्हणाल्या की, योजना यशस्वीपणे सुरू असून लाभवाढीचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री योग्य वेळी घेतील. त्यामुळे लाडक्या बहिणींच्या हप्त्यात वाढ होणार का, याकडे राज्यातील लाखो महिलांचे लक्ष लागले आहे.