महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलचा साठा किती दिवस पुरणार? छगन भुजबळांचा मोठा खुलासा…

मुंबई : राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या संभाव्य तुटवड्याच्या अफवा पसरत असताना राज्य सरकारने नागरिकांना दिलासा दिला आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी राज्यात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असून कोणतीही टंचाई नाही, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जास्त इंधन खरेदी करून साठवणूक करू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.
अफवांमुळे वाढलेली इंधन खरेदी…

गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये चढ-उतार दिसून येत आहेत. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात इंधनटंचाई निर्माण होणार असल्याच्या अफवा सोशल मीडियावर पसरल्या. त्यामुळे अनेक ठिकाणी नागरिकांनी गरजेपेक्षा जास्त प्रमाणात पेट्रोल आणि डिझेल खरेदी करण्यास सुरुवात केली असून मागणीत वाढ झाली आहे.
छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले की राज्यात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असून पुरवठा व्यवस्था पूर्णपणे सुरळीत आहे. केवळ अफवांमुळे मागील काही दिवसांत इंधन विक्रीत सुमारे 20 टक्क्यांनी वाढ झाल्याचेही त्यांनी सांगितले. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता संयम बाळगावा आणि अनावश्यक साठवणूक टाळावी, असे त्यांनी आवाहन केले.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यासंदर्भात प्रतिक्रिया देत जिल्हाधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्याचे सांगितले. शेती कामांसाठी डिझेलचा पुरवठा सुरळीत राहावा यासाठी विशेष नियोजन करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले असून, आवश्यकतेनुसार इंधन उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचेही त्यांनी नमूद केले.
