वारीसाठी पुणे महापालिकेचा मोठा निर्णय; १०१ शाळांना सुट्टी, वारकऱ्यांसाठी निवासाची विशेष व्यवस्था

पुणे : देहू आणि आळंदी परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने वारकऱ्यांच्या सोयीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आषाढी वारीसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या भाविकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी महापालिकेच्या १०१ शाळांमध्ये त्यांच्या निवासाची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे संबंधित शाळांना उद्यापासून रविवारपर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या हजारो वारकऱ्यांसाठी सुरक्षित निवारा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. देहू-आळंदी परिसरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले असून काही भागांमध्ये पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. तसेच हवामान विभागाने पुढील काही दिवस अतिवृष्टीचा इशाराही दिला आहे.
या पार्श्वभूमीवर प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून वारकऱ्यांना पुणे शहरातील महापालिकेच्या शाळांमध्ये तात्पुरती निवास व्यवस्था उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. शाळांमध्ये पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, वीज, स्वच्छता आणि इतर मूलभूत सुविधांची व्यवस्था करण्यात येत आहे. संबंधित विभागांना आवश्यक तयारी पूर्ण करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, वारीदरम्यान भाविकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत असून, पावसाच्या परिस्थितीवर प्रशासनाकडून सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. वारकऱ्यांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी महापालिका, जिल्हा प्रशासन आणि पोलिस यंत्रणा समन्वयाने काम करत आहेत.
