सोलापूर-पुणे महामार्गावर भीषण अपघात! अक्कलकोटला दर्शनासाठी जाणाऱ्या कारला कंटेनरची धडक, ८ वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

सोलापूर : अक्कलकोट येथे स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी निघालेल्या कल्याणमधील भारंबे कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर वडाचीवाडी गावाच्या हद्दीत कार आणि कंटेनरची भीषण धडक झाली. या अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला असून, मृतांमध्ये अवघ्या ८ वर्षांच्या बालकाचाही समावेश आहे. तर कारचालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सोलापूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

स्वामींच्या दर्शनासाठी जात असतानाच काळाचा घाला
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण येथील भारंबे कुटुंब अर्टिगा कारने अक्कलकोट येथे स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी जात होते. शुक्रवारी (६ नोव्हेंबर) दुपारी सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास शेटफळ ते तेलंगवाडी दरम्यान वडाचीवाडी शिवारात त्यांच्या कारची समोरून येणाऱ्या कंटेनरशी जोरदार धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

या दुर्घटनेत विलास चांगू भारंबे (वय ६६), शोभा विलास भारंबे (वय ६३), पूनम तुषार भारंबे (वय ३८) आणि पार्थ तुषार भारंबे (वय ८) यांचा मृत्यू झाला. तर कार चालवत असलेले तुषार विलास भारंबे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने सोलापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
पोलीस आणि ग्रामस्थांकडून तातडीने मदत
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे आणि पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्या पथकाने मोहोळ पोलिसांसह घटनास्थळी पोहोचून बचावकार्य केले. वाहनात अडकलेल्या मृतांना बाहेर काढण्यात आले, तर जखमी तुषार यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले.
दरम्यान, अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी क्रेनच्या मदतीने अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरून बाजूला केल्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली. या अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, मोहोळ पोलीस पुढील तपास करत आहेत.
स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी निघालेल्या कुटुंबावर वाटेतच काळाने घाला घातल्याने कल्याणसह परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
