पुण्यात भीषण अपघात! एसटी आगाराची बस खराब रस्त्यावरुन घसरली अन थेट गटारात कोसळली

पुणे : गेल्या काही दिवसापासून पुण्यात एसटी बसच्या अपघाताचे प्रमाण वाढल्याचं समोर येत आहे. अशातच आता पुण्यात एका एसटी बसचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील भोरमध्ये दुर्गम दुर्गाडी मार्गावर एसटी आगाराची बस साईड पट्टीवरुन घसरली आणि गटारात कलंडली. एसटी बसमधील प्रवाशांना किरकोळ जखमा झाल्या आहेत.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील भोरमधील दुर्गम दुर्गाडी मार्गावर एसटी बस घसरुन गटारात कोसळली. अरुंद रस्त्यावर समोरुन येणाऱ्या वाहनाला साईड देताना ही बस गटारात खचल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. अपघाताच्या वेळी बसमध्ये वाहन चालकासह पाच प्रवासी प्रवास करत होते. अपघातानंतर जेसीबीच्या सहाय्याने बस गटारातून बाहेर काढण्यात आली.
दरम्यान वारंवार एसटी बस साईड पट्टीवरुन घरुन गटारात कलंडत असल्याने प्रवासी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी संबंधित प्रशासनाने रस्त्यांचे रुंदीकरण, रस्त्यावरील खड्डे, साईड पट्ट्या मोठ्या भरावाच्या कराव्यात अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.
